Amphan Cyclone Update: ‘अ‍म्फन’चे ‘सुपर सायक्लोन’मध्ये रूपांतर, बुधवारी धडकणार पश्चिम बंगालच्या किनारपट्टीला

Amphan Cyclone Update: Amphan transformed into 'Super Cyclone', to hit West Bengal coast on Wednesday

एमपीसी न्यूज – ‘अ‍म्फन’ चक्रीवादळाचे रूपांतर ‘सुपर सायक्लोन’मध्ये झाले असून आज हे चक्रीवादळ ओडिशाच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता असल्याची माहिती NDRF चे प्रमुख एस. एन. प्रधान यांनी एका वृत्तवाहिनीला दिली आहे. या वादळाचा तडाखा पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनारपट्टीच्या भागांना बसणार आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं चक्रीवादळ अ‍म्फन हे अधिक तीव्र झाले असून आज (मंगळवारी) दुपारी 2.30 वाजता ते आणखी रौद्ररूप धारण करणार असून येत्या 12 तासांत ते वादळ आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. हे वादळ 155 ते 165 किलोमीटर प्रतितास या प्रचंड वेगाने प्रवास करत असून, 20 मेला दुपारी किंवा संध्याकाळपर्यंत बांगलादेशच्या हथिया बेटाला आणि पश्चिम बंगालमधील दिघाला पार करून जाईल, अशी शक्यता भारतीय हवामान खात्याचे संचालक मृत्युंजय मोहापात्रा यांनी वर्तवली आहे.

‘स्कायमेट’ या हवामान विषयक संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, ‘सुपर सायक्लोन’ जसजसे पुढे येत आहे तसा  किनारपट्टीवरील वाऱ्याचा वेग वाढत आहे. एवढेच नव्हे तर ओडिशा, पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश आणि पूर्वोत्तर राज्यांच्या किनारपट्टीवरील वाऱ्याचा वेग सायक्लोन’च्या फाॅलडाऊनपर्यंत वाढतच राहील, असे सांगण्यात आले आहे. विशेष करून ओडिशा, पश्चिम बंगाल आणि पूर्वोत्तर राज्यांच्या काही भागातील किनारपट्टीवर जवळपास ताशी 50 ते 60 किलोमीटर या वेगाने वारे वाहू शकतात, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

बंगालच्या खाडीत मोठी उलथापालथ सुरू असून वाऱ्याचा वेग प्रचंड वाढत आहे. सायक्लोन अ‍ॅम्फन उत्तर आणि उत्तर पूर्व दिशेने पुढे सरकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  अंपन सायक्लोन 20 मे रोजी दुपारी पश्चिम बंगाल आणि बांगलादेश किनारपट्टीवर धडकणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये रेड अलर्ट, बचावकार्यासाठी ‘NDRF’ च्या तुकड्या तैनात

‘सुपर सायक्लोन’चा धोका ओडिशातील 12 जिल्ह्यांना आणि पश्चिम बंगालमधील कोलकातासह 5 जिल्ह्यांना अधिक आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम बंगालमधील 24 परगना, उत्तर 24 परगना, पूर्व आणि पश्चिम मिदनापूर जिल्ह्यांना हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. पुढील आदेशापर्यंत मच्छिमारांना समुद्रात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. ‘सुपर सायक्लोन’मुळे पश्चिम बंगालच्या किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

सुपर सायक्लोन’च्या पार्श्वभूमीवर ओडिशात

मदत आणि बचावकार्यासाठी NDRF च्या 13 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत, तर 17 तुकड्यांना सतर्क ठेवण्यात आलं आहे. पश्चिम बंगालमध्ये 19 तुकड्या तैनात केल्या गेल्या आहेत आणि 4 तुकड्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची  माहिती NDRFच्या प्रमुखांनी दिली आहे.

मागच्या वर्षी सुद्धा आलेल्या ‘फनी’ या चक्रीवादळाचा तडाखा पश्चिम बंगालला बसला होता. अ‍ॅम्फन सुपर सायक्लोनच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने सुद्धा तयारी सुरू केली असून, मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

सौजन्य – Skymet Weather

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.