Cyclone Amphan Update: अम्फन चक्रीवादळ आज दुपारी भारताच्या पूर्व किनारपट्टीला धडकणार, आठ राज्यांमध्ये दक्षतेचा इशारा

Cyclone Amphan Update: Cyclone Amphan will hit India's east coast this afternoon, alert in eight states

एमपीसी न्यूज – बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले चक्रीवादळ अम्फन आज (20 मे) दुपारनंतर पश्चिम बंगालच्या दीघा आणि बांगलादेशच्या हतिया बेटाजवळ धडकण्याची शक्यता आहे. त्यावेळी वादळाचा वेग प्रतितास 185 किमी असू शकतो. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने ओदिशा, पश्चिम बंगालसह आठ राज्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. ओदिशाच्या समुद्रकिनाऱ्यावरील जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

अम्फन चक्रीवादळाचा फटका पश्चिम बंगाल, ओदिशा, त्रिपुरा, मिझोरम, मणिपूरसह तामिळनाडू, पुद्दुचेरी, आंध्र प्रदेश या राज्यांना बसण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्या ठिकाणी संभाव्य नैसर्गिक संकटाचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

चक्रीवादळ अम्फन मंगळवारी (19 मे) अंशत: कमकुवत झाले असले तरी धोका टळलेला नाही. पश्चिम बंगाल आणि ओदिशाच्या समुद्रकिनाऱ्यालगतच्या जिल्ह्यांचे नुकसान करण्याएवढी ताकद या चक्रीवादळात अद्याप आहे. त्यामुळे या दोन राज्यांमधील लाखो लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.

पश्चिम बंगालच्या दीघा किनाऱ्यापासून 510 किमी अंतरावर बंगालच्या उपसागरात या चक्रीवादळाचं केंद्र आहे. त्यामुळे हे वादळ उत्तर आणि उत्तर पूर्व दिशेने सरकण्याचा अंदाज आहे. त्यामुळे दोन्ही राज्यात अधिक सतर्कता बाळगली जात आहे.

चक्रीवादळ काही प्रमाणात कमकुवत झाले आहे. हे वादळ उत्तर-उत्तरपूर्वच्या दिशेला बंगालच्या उपसागरात पोहोचण्याची आणि बुधवारी दुपारी किंवा संध्याकाळी पश्चिम बंगालच्या दीघा आणि बांगलादेशमधील हटिया बेटावरुन जाण्याची शक्यता आहे. या वादळाच्या वेळी हवेचा वेग 155 ते 165 किलोमीटर प्रतितास कायम राहिल. तर अधूनमधून हा वेग 180 किलोमीटर प्रतितासपर्यंत वाढू शकतो, असे हवामान खात्याच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

चक्रीवादळाचा धोका पाहता राज्य सरकारांसह केंद्र सरकारही सतर्क झाले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा केली. केंद्र सरकार शक्य ती सर्व मदत करेल, असे आश्वासन त्यांनी दिले. दुसरीकडे कोलकातामध्ये चक्रीवादळाचा परिणाम दिसू लागला असून पाऊस सुरु आहे. बंगालमध्ये भूस्खलनाची शक्यताही वर्तवली जात आहे.

एनडीआरएफची 41 पथके तैनात

अम्फन चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल आणि ओदिशामध्ये आतापर्यंत एनडीआरएफची एकूण 41 पथके तैनात करण्यात आली आहेत. एनडीआरएफचे प्रमुख एस.एन. प्रधान यांनी काल (मंगळवारी) नवी दिल्लीत सांगितले की, अम्फन चक्रीवादळाच्या रुपात हे दुसरे संकट आहे. कारण आपण आधीच कोरोना विषाणूचा सामना करत आहोत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तयारी केली आहे. अम्फनमुळे ओदिशा आणि पश्चिम बंगालमध्ये जास्त नुकसान होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून एनडीआरएफच्या एकूण 41 पथके तैनात करण्यात आली आहेत. ओदिशाच्या सात जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफची 15 पथके तैनात करण्यात आली आहेत. तर पाच पथके सज्ज ठेवली आहेत. पश्चिम बंगालच्या सहा जिल्ह्यात 19 पथके तैनात असून दोन पथके सज्ज ठेवली आहेत. अम्फन 20 मे रोजी धडकेल त्यावेळी जास्त नुकसान होण्याचा अंदाज आहे. त्यानुसार तयारी करण्यात आली आहे, अशी माहिती प्रधान यांनी दिली.

व्हिडिओ साभार : Skymet Weather

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.