Pune Weather Update : पुढील पाच दिवस पुण्यासह या भागात मुसळधार पाऊस

एमपीसी न्यूज : ऑक्टोबर महिना सुरू झाला तरी राज्यात पावसाचे थैमान सुरूच आहे. महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळत आहेत. मात्र मुंबईसह राज्यभरात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

परतीचा पाऊस असल्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाचे उपमहासंचालक होशाळीकर यांनी दिला आहे. तर मुंबई, कोकण, पुणे, सातारा, पालघर, ठाणे, मध्य महाराष्ट्रात यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. ६ ऑक्टोबरपासून राज्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून पुढचे ४ ते ५ दिवस मुसळधार पाऊस कायम राहणार आहे.

मात्र विजांच्या कडकडाटामुळे मुसळधार पाऊस होणार असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. कारण यापूर्वी मुसळधार पावसामुळे राज्यात काही ठिकाणी वीज कोसळल्यामुळे मोठ्याप्रमाणात जीवितहानी झाली आहे.

यंदा मुंबईसह राज्यांतील अनेक भागांना मुसळधार पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. अनेक ठिकाणी विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. तर अनेक जिल्ह्यांमध्ये महापुराची परिस्थिती निर्माण झाली होती. चिपळूण, महाडसारख्या ठिकाणी पूरस्थितीमुळे दरडी कोसळल्याचा दुर्घटना घडल्या. तर मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात पावसाने धुमशान घातले होते. गणेशोत्सवानंतर काही काळ पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा पावसाने धुमशान घालण्यास सुरुवात केली आहे.

पुढील हवामानाचा अंदाज आणि इशारा
७ ऑक्टोबर – नंदूरबार, धुळे, जळगाव, हिंगोली, नांदेड वगळता उर्वरित महाराष्ट्रात ‘यलो अलर्ट’ जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.

८ ऑक्टोबर – विदर्भ आणि कोल्हापूर वगळता उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

९ ऑक्टोबर – विदर्भ आणि नाशिक विभाग वगळता राज्यात सर्व ठिकाणी यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

१०, ११ ऑक्टोबर – या दिवशीही नाशिक आणि विदर्भ वगळता उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.