Pune News : छत्रपती शिवाजी महाराजांच्या अप्रकाशित चित्राचा अनावरण सोहळा संपन्न

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांचे एक अप्रकाशित चित्र समोर आले आहे. हे चित्र सतराव्या शतकातील गोवळकोंडा चित्रशैलीतील आहे. अठराव्या शतकापासून हे चित्र फ्रान्समधील लुईस चार्ल्स या सरदार घराण्याच्या ऐतिहासिक वास्तू संग्रहात होते. याबाबत इतिहास संशोधक प्रसाद तारे यांनी आज पत्रकार परिषदेत माहिती दिली.

तारे यांनी शोधलेल्या या चित्राचे अनावरण करण्यात आले असून चित्राच्या प्रकाशनासाठी संग्रहालयाकडून परवानगी देखील घेण्यात आली आहे. यावेळी भारत इतिहास संशोधक मंडळाचे सचिव पांडुरंग बलकवडे आणि इतिहास अभ्यासक राजेंद्र टिपरे हे यावेळी उपस्थित होते.

सर्व चित्रे अल्बम स्वरूपात सॅव्ही कलेक्शनमध्ये 

प्रस्तुत चित्राबरोबरच भारतामधील सतराव्या शतकातील कुतुबशहा, औरंगजेब, मादण्णा अशा अन्य व्यक्तींची चित्रेही या संग्रहात आहेत. अठराव्या शतकापासून ही सर्व चित्रे फ्रान्समधील लुईस चार्ल्सस या सरदार घराण्याच्या ऐतिहासिक वास्तु संग्रहालयात होती. तेथून ती फ्रान्समधील सॅव्ही नावाच्या संग्राहकाच्या ऐतिहासिक वास्तुसंग्रहात हस्तांतरित झाली, अशी नोंद वास्तुसंग्रहाच्या रेकॉर्डमध्ये आहे. सध्या ही सर्व चित्रे अल्बम स्वरूपात सॅव्ही कलेक्शनमध्येच आहेत, असेही तारे यांनी सांगितले.

राज्याभिषेकानंतर तीन वर्षांनी काढलेले चित्र

शिवकाळात भारतात अनेक प्रादेशिक चित्रशैली अस्तित्वात होत्या. त्यापैकी कुतुबशहाची राजधानी असलेल्या आंध्र- प्रदेशातील गोवळकोंडा येथे प्रचलित असलेल्या चित्रशैलीला गोवळकोंडा चित्रशैली असे म्हणतात. राज्याभिषेकानंतर तीन वर्षांनी महाराज दक्षिण भारताच्या मोहिमेवर गेले असताना त्यांची अनेक चित्रे काढली गेली. त्या सर्व चित्रांपैकीच हे चित्रदेखील असून, त्याचा चित्रकार मात्र अज्ञात आहे.

युरोपियन देशांमधील अनेक वखारी सतराव्या शतकात भारतामध्ये होत्या. त्यातील काही वखारी गोवळकोंडा परिसरात व भारताच्या पूर्व किनारपट्टीवर होत्या. त्या वखारींपैकी कोणा फ्रेंच अधिकार्‍याने प्रस्तुत चित्रे विकत घेतली किंवा हस्तांतरित करून घेतली आणि यथावकाश आपल्या मायदेशी युरोपमध्ये पाठविली. त्यानंतर म्हणजेच अठराव्या शतकात ती तेथील लुईस चार्ल्स घराण्याच्या ऐतिहासिक वस्तुसंग्रहात दाखल झाली, असे तारे यांनी सांगितले.

चित्राची खासियत

चित्रामध्ये महाराजांची करारी व प्रसन्न मुद्रा, डोक्यावर शिरोभूषण व तुरा, खांद्यावर शेला दिसत असून त्यांच्या डाव्या बाजूला कट्यार खोवलेली आहे. चित्रामध्ये महाराज एका मोकळ्या जागेत उभे आहेत असे दाखविण्यात आले आहे. हे चित्र १७ व्या शतकातील असल्याचा अंदाज आहे, असे तारे यांनी स्पष्ट केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.