A.R. Rahman On Nepotism: माझ्याविरोधात देखील अपप्रचार केला जात आहे – रेहमान

AR Rahman's revelation about 'gangs' working against him adds legitimacy to recent claims about Bollywood आपल्याविरोधात अशा उडवल्या जाणाऱ्या अफवांमुळे चित्रपटसृष्टीत कोणीही आपल्याला काम देत नाही, असा दावा त्यांनी केला होता.

एमपीसी न्यूज – आपल्या वेगळ्या शैलीच्या संगीतामुळे रसिकांच्या मनात घर करणारे संगीतकार म्हणून ए. आर. रेहमान यांना ओळखले जाते. हिंदी संगीतात पाश्चात्य ढंग आणण्याची किमया रेहमान यांनी साधली. याआधी आरडी बर्मन यांनी हा बाज जोपासला होता. रेहमान यांनी आतापर्यंत अनेक हिंदी चित्रपटांना वैशिष्ट्यपूर्ण असे संगीत दिले आहे. त्यांना आजवर अनेक मोठे पुरस्कारही मिळाले आहेत. इतकंच काय तर त्यांनी ऑस्कर पुरस्कारावरही आपलं नाव कोरलं आहे.

परंतु, सध्या रेहमान वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आले आहेत. आपल्या विरोधात एक गट अफवा पसरवत आहे, असा आरोप रेहमान यांनी केला होता. तसंच आपल्याविरोधात अशा उडवल्या जाणाऱ्या अफवांमुळे चित्रपटसृष्टीत कोणीही आपल्याला काम देत नाही, असा दावा त्यांनी केला होता.

त्यांच्या या ट्विट नंतर अनेकांनी यात उडी घेतली होती. वाढलेला वाद पाहता रेहमान यांनी पुन्हा एकदा ट्विट करत आपलं मत व्यक्त केलं आहे.

‘गेलेला पैसा परत मिळू शकतो. गेलेलं फेमही परत मिळू शकतं. परंतु, आपल्या आयुष्यातील वाया गेलेली वेळ ही पुन्हा मिळत नाही. शांतता. यातून आपण बाहेर पडू. आपल्याकडे करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत’, असं म्हणत ए.आर.रेहमान यांनी या वादाला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपट दिग्दर्शक शेखर कपूर यांच्या ट्विटला रेहमान यांनी रिट्विट करत उत्तर दिलं आहे.


‘मी चांगले चित्रपट कधीच नाकारत नाही. परंतु, असा एक गट आहे जो काही गैरसमजांमुळे माझ्याविरोधात अफवा पसरवत आहे. मुकेश छाब्रा हे माझ्याकडे आले होते आणि मी दोन दिवसांमध्ये त्यांना गाणी तयार करून दिली’, असं ते म्हणाले होते.

‘छाब्रा यांनी मला सांगितलं की अनेकांनी त्यांना माझ्याकडे जाऊ नका असं म्हटलं. तसंच माझ्याविरोधातही त्यांना निरनिराळ्या गोष्टी सांगितल्या’, असंही रेहमान यांनी यावर बोलताना सांगितलं.

‘त्यांच्या गोष्टी ऐकून मला समजलं की मला सध्या काम का मिळत नाहीये आणि चांगले चित्रपट माझ्याकडे का येत नाहीयेत. चित्रपटसृष्टीत काही लोक असेही आहेत ज्यांना वाटतं की मी त्यांच्यासोबत काम करावं आणि अशीही काही लोकं आहेत ज्यांना वाटतं की मला काम मिळू नये. मी नशीबावर विश्वास ठेवतो आणि तुमच्याकडे सर्व काही देवाकडूनच येत असल्याचंही ते म्हणाले होते’.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील नेपोटिझम म्हणजे घराणेशाहीचा वाद जोरात उफाळून आला. अनेकांनी या विषयावर अनेक मतमतांतरे व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.