Second World War: दुसरे महायुद्ध…

article on second world war written by shripad shinde जपानने पर्ल हार्बरवर केलेल्या हल्ल्यात अमेरिकेचे अडीच हजार नौसैनिक मारले गेले. तसेच 300 विमाने, 8 बॅटलशिप आणि 20 नेवल व्हेसल्स जपानच्या नौसेनेने नेस्तनाबूत केल्या.

0

एमपीसी न्यूज (श्रीपाद शिंदे)- दि.1 सप्टेंबर 1939 रोजी जर्मनीने पोलंडवर हल्ला केला आणि दुस-या महायुद्धाला सुरुवात झाली. आतापर्यंत जेवढ्या लढाया झाल्या, त्यात दोन किंवा त्यापेक्षा अधिक शत्रू राष्ट्रांचे सैनिक आमनेसामने येऊन लढले. प्रत्यक्षात सैनिकांमध्ये ही युद्धे लढली जात होती. मात्र, हा पायंडा दुसऱ्या महायुद्धाने मोडला. दुस-या महायुद्धात सर्वसामान्य नागरिकांना देखील लक्ष्य करण्यात आले. विमानांच्या मदतीने शहरेच्या शहरे नेस्तनाबूत केली गेली.

जर्मनीने पोलंडवर विजय मिळविण्यासाठी रशियासोबत मैत्री (मोल्टोव-रीबेंट्रोप पॅक्ट) केली. या करारानुसार रशियाने पोलंडवर पूर्वेकडून हल्ला करावा आणि जर्मनीने पश्चिमेकडून हल्ला करावा. दोघांनी मिळून पोलंड जिंकायचा आणि नंतर अर्धा-अर्धा वाटून घ्यायचा. हे एवढं सरळ गणित या करारात मांडण्यात आले होते. त्यासाठी दोन्ही राष्ट्रे तयार देखील झाली.

1 सप्टेंबर 1939 रोजी जर्मनीने पोलंडवर हल्ला केला आणि दुस-या महायुद्धाला सुरुवात झाली. प्रत्युत्तर म्हणून ब्रिटन आणि फ्रान्सने जर्मनीवर हल्ला करण्याची घोषणा केली. रशियाने पोलंडवर पूर्वेकडून हल्ला केला. काही दिवसांत जर्मनी आणि रशिया या दोघांनी मिळून पोलंड जिंकला आणि ठरल्याप्रमाणे वाटून घेतला.

दुसरे महायुद्ध देखील दोन गटांमध्ये झाले. पहिला गट मित्र राष्ट्रांचा होता. ज्यामध्ये युनायटेड किंग्डम / ब्रिटन (UK), फ्रान्स, चीन, अमेरिका (1941-1945), रशिया-USSR (1941-1945) हे प्रमुख देश होते. तर दुसरा गट अ‍ॅक्सिस पॉवर / अक्ष राष्ट्रांचा होता. ज्यामध्ये जर्मनी, इटली आणि जपान या प्रमुख देशांचा समावेश होता.

रशिया (सोव्हिएत संघ) या युद्धात 1939 ते 1941 पर्यंत अ‍ॅक्सिस पॉवर कडून लढला. त्यानंतर जर्मनीने रशियावर हल्ला केला आणि रशिया त्यानंतरच्या काळात मित्र राष्ट्रांमध्ये 1945 पर्यंत सहभागी झाला. पोलंडवर हल्ला करतेवेळी रशिया आणि जर्मनी मित्र झाले होते. मग अचानक जर्मनीने रशियावर हल्ला का केला? याची सुद्धा एक गम्मत आहे. ते पुढे येईलच.

अमेरिका देखील सुरुवातीला युद्धात सहभागी नव्हता. पण जपानने अमेरिकेच्या सैन्याच्या एका बेटावर (पर्ल हार्बर) हल्ला केला आणि अमेरिका युद्धात सहभागी झाला. अमेरिका दोन्ही युद्धात शेवटी सहभागी झाला आणि निर्णायक लढाई करूनच थांबला. पहिल्या महायुद्धात जर्मनीच्या यू-बोटने प्रवासी नागरिकांची बोट बुडवून अमेरिकेचे सव्वाशे नागरिक मारले तेव्हा अमेरिका युद्धात सहभागी झाला होता.

पोलंडवरील विजयानंतर रशियाने आपला मोर्चा लिथुनिया, लेटाविया, एस्टोनियाकडे वळवला. रशियन सैन्याने हे तिन्ही प्रांत काही दिवसात ताब्यात घेतले.

सुरुवातीला जर्मनी भरपूर जोशात होता. युद्धात ट्रक आणि टॅंकचा वापर करून जर्मन सैन्य एका दिवसात 100 ते 200 किलोमीटर पुढे जात होते. याच तंत्राचा वापर करून जर्मनीने डेन्मार्क, नॉर्वे, बेल्जियम आणि नेदरलंड या चार देशांना चार महिन्यात जिंकले.

विजयी घोडदौडीमुळे जर्मन सैन्याचे मनोबल वाढले होते. जर्मनीने आता फ्रान्सकडे आपला मोर्चा वळवला. 10 जून 1940 रोजी जर्मनीने फ्रान्सवर हल्ला केला आणि अवघ्या चार दिवसात म्हणजेच 14 जून 1940 रोजी पॅरिसवर विजय मिळवला.

अवघ्या चार दिवसात मिळवलेल्या या विजयामुळे अवघ्या जगाच्या भुवया उंचावल्या गेल्या. हिटलरची भीती जगात पसरली.

फ्रान्समधील विजयानंतर जर्मनीने फ्रान्सचा चांगला मित्र असलेल्या ब्रिटनवर हल्ला करण्याची तयारी केली. जर्मनी आणि ब्रिटन यांच्यामध्ये केवळ हवाई युद्ध चालले. जमिनीवर एकही सैनिक लढत नव्हता.

ब्रिटनने आत्मसमर्पण करावं किंवा तह करावा, अशी हिटलरची इच्छा होती. पण असे झाले नाही. ब्रिटनची रॉयल एअरफोर्स आणि नेव्ही ही जर्मनीला भारी पडली. आपला निभाव लागणे कठीण असल्याचे हिटलरला कळून चुकले आणि त्याने हे युद्ध अचानक थांबवले.

27 सप्टेंबर 1940 रोजी जर्मनी, जपान आणि इटली यांच्यात ट्रीपार्टीएट पॅक्ट (Tripartiat Pact) नावाचा तह झाला. या तहानेच अ‍ॅक्सिस पॉवरला जन्म दिला. हंगेरी, बुल्गेरिया, रोमानिया हे देशही अ‍ॅक्सिस पॉवरमध्ये नंतर सहभागी झाले.

1940 च्या शेवटापर्यंत जर्मनीने ग्रीस आणि युगोस्लोवाकीयावर ताबा मिळवला. 1940च्या शेवटापर्यंत जर्मनीने जवळपास सगळ्या युरोपला जिंकले होते.

नाझी पार्टीचे असे मत होते की, जर्मन लोकांना राहण्यासाठी जास्त जागा नाही. प्रत्येक व्यक्तीला मोठ्या ऐसपेस जागेत राहता यायला हवं. त्यामुळे आपल्या कक्षा रुंदावल्या पाहिजेत. याच मानसिकतेतून हिटलरने आता युरोपातील सर्वात मोठा देश रशियावर आक्रमण करण्याचा निर्णय घेतला.

22 जून 1941 रोजी जर्मनीने रशियावर हल्ला केला. पण रशियात असलेल्या थंड वातावरणात जर्मन सैन्याचा निभाव लागला नाही. त्यामुळे जर्मनी रशियाला जिंकू शकला नाही. याच कारणामुळे रशिया अ‍ॅक्सिस पॉवर मधून बाहेर पडला आणि 1941 साली मित्र राष्ट्रांना जाऊन मिळाला.

आशिया खंडात जपानचा बोलबाला अन अमेरिकेची युद्धात उडी

1940 पर्यंत जपानने चीनचा मोठा हिस्सा जिंकला. जपान अ‍ॅक्सिस पॉवरचा भाग असल्याने ब्रिटनच्या आशिया खंडातील वसाहतींवर आक्रमण करून त्यावर ताबा मिळवू लागला.

इंडो चायना (व्हिएतनाम), म्यानमार (बर्मा), हॉंगकॉंग, गुआम, इंडोनेशिया, सिंगापूर, फिलिपिन्स या देशांवर जपानने कब्जा केला. फिलिपिन्समध्ये ब्रिटनची वसाहत नव्हती. तिथे अमेरिकेची वसाहत होती. अमेरिकेच्या वसाहतीवर जपानने कब्जा केल्याने अमेरिकेने जपानचा तेल पुरवठा बंद केला.

यामुळे चवताळलेल्या जपानने 7 डिसेंबर 1941 रोजी अमेरिकेच्या ‘पर्ल हार्बर’वर हल्ला केला. पर्ल हार्बर हे अमेरिकेचे एक बेट आहे. तिथे अमेरिकेची नैसेना आणि वायुसेना मोठ्या प्रमाणात होती. थेट अमेरिकेत जाऊन भिडण्यापेक्षा बाहेरच्या बाहेर अमेरिकेच्या सैन्य बेटावर हल्ला करून अमेरिकेला इंगा दाखवू, असा जपानचा इरादा होता.

जपानने पर्ल हार्बरवर केलेल्या हल्ल्यात अमेरिकेचे अडीच हजार नौसैनिक मारले गेले. तसेच 300 विमाने, 8 बॅटलशिप आणि 20 नेवल व्हेसल्स जपानच्या नौसेनेने नेस्तनाबूत केल्या. खरंतर जपानला अमेरिकेच्या विमानवाहू नौका नष्ट करायच्या होत्या. त्यासाठी जपानने तीन टप्प्यात (सकाळी आठ वाजता, सकाळी दहा वाजता आणि दुपारी एक वाजता) या तळावर हल्ला करण्याची योजना केली होती.

पण दुस-या टप्प्यात बॅटलशिप उडवल्यानंतर जपानला वाटले की आपण विमानवाहू नौका नष्ट केल्या. पण अमेरिकेच्या विमानवाहू नौका सुरक्षित होत्या. हीच बाब पुढे जपानला भारी पडली.

8 डिसेंबर 1941 रोजी अमेरिका युद्धात उतरला. अमेरिकेने जपानच्या विरोधात युद्ध जाहीर केले. दोन वर्षे जपानसोबत लढल्यानंतर अमेरिकेने आपली सर्व बेटे जपानच्या ताब्यातून परत मिळवली. अमेरिकाही युद्धात उतरल्याने मित्र राष्ट्रांना बळकटी मिळाली.

1942 पर्यंत अ‍ॅक्सिस पॉवरचा दबदबा कमी झाला. अमेरिका आणि मित्र राष्ट्रांनी अ‍ॅक्सिस पॉवरला मोरोक्को आणि ट्युनिशियामधून हाकलून लावले. इटलीवर आक्रमण करून अर्ध्या इटलीवर मित्र राष्ट्रांनी ताबा मिळवला.

दुसरीकडे 1944 मध्ये रशियाने जर्मनीकडून युरोपचा पूर्वेकडील भाग हिसकावत बर्लिनकडे कूच केली.

जपानने भारतातील आसाममध्ये आक्रमण केले. अमेरिकेने तेल पुरवठा बंद केल्यानंतर नैसर्गिक तेलाचे साठे शोधून आपल्या गरजा भागवण्यासाठी जपानची धडपड सुरु होती. त्यातून हे आक्रमण केले होते. यालाच बॅटल ऑफ इम्फाळ असेही म्हटले जाते. पण ब्रिटनच्या आर्मीने जपानला भारतातून हुसकावून लावले.

6 जून 1944 रोजी मित्र राष्ट्रांची फौज नॉर्दर्न फ्रान्समध्ये दाखल झाली. पुढील काही महिन्यात मित्र राष्ट्रांनी फ्रान्सला जर्मनीच्या बंधनातून मुक्त केला.

1945 पर्यंत जर्मनीचे सैन्य पूर्णपणे हरले होते. नेदरलंड आणि बेल्जियम मार्गे मित्र राष्ट्र जर्मनीत दाखल झाले. जर्मन सैन्याने आपले भविष्य जाणले आणि 29 एप्रिल 1945 रोजी मित्र राष्ट्रांपुढे हत्यार टाकून आत्मसमर्पण केले. 30 एप्रिल 1945 रोजी हिटलरने भूमिगत बंकरमध्ये आत्महत्या केली आणि जर्मनी दुसरे महायुद्ध देखील हरला.

जपान अजूनही युद्धाच्या आखाड्यात सक्रिय होता. जपानला रोखण्यासाठी अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरांवर अनुक्रमे 6 ऑगस्ट 1945 आणि 9 ऑगस्ट 1945 रोजी अणुबॉम्ब टाकला. 15 ऑगस्ट 1945 रोजी जपानने आत्मसमर्पण केले.

म्हटलं जातं… मित्र राष्ट्रांच्या या विजयी दिवसाला स्मृतीत ठेवण्यासाठी ब्रिटेनने भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी 15 ऑगस्टचा दिवस निवडला.

युद्ध संपलं पण ….

दुस-या महायुद्धानंतर रशिया आणि अमेरिका हे दोन देश सुपरपॉवर बनले. पहिल्या महायुद्धानंतर अमेरिका एकटा सुपरपॉवर होता. पण दुस-या महायुद्धानंतर त्याला प्रतिस्पर्धी तयार झाला. यामुळे या दोन देशात शीतयुद्ध सुरु झाले. हे शीतयुद्ध 1947 पासून 1991 पर्यंत चालले.

जग दोन भागात विभागले गेले. पहिला भाग – नाटो (North Atlantic Treaty Organization) आणि दुसरा भाग – Warsaw Pact (हा रशियाने बनवला होता)

जर्मनी देशाचे विभाजन झाले आणि तो देश दोन गटात वाटण्यात आला.

जगातील अन्य देशांमधून जर्मन लोकांना परत जर्मनीला पाठवण्यात आलं. कारण हे जर्मन नागरिक ज्या प्रदेशात राहतात तिथेच हक्क सांगून पुन्हा तिसरे महायुद्ध करतील, या भीतीमुळे त्यांना मायदेशी पाठवण्यात आले.

दुस-या महायुद्धात सात ते आठ कोटी लोक मारले गेले. हा आकडा 1940 सालच्या जगाच्या आकडेवारीच्या तीन टक्के एवढा होता.

फ्रान्स आणि ब्रिटनच्या ज्या-ज्या राष्ट्रात वसाहती होत्या. त्या वसाहती नष्ट करून संबंधित देशांना स्वतंत्र करण्यात आले.

इस्राईलची निर्मिती झाली

चीनमध्ये कम्युनिस्ट आणि नॅशनॅलिस्टमध्ये लढाई झाली. 1949 मध्ये ही लढाई संपली. या लढाईत कम्युनिस्ट जिंकले. त्यानंतर नॅशनॅलिस्ट तैवान या बेटावर स्थलांतरित झाले. आजही ते त्याच बेटावर राहत आहेत.

भारताचे 25 लाख सैनिक ब्रिटनच्या बाजूने युद्धात सहभागी झाले. त्यातील सुमारे 78 हजार सैनिकांचा मृत्यू झाला. त्यावेळच्या बेंगॉलमध्ये (आताचा बांगलादेश आणि पश्चिम बंगालचा काही भाग) भूकमारीमुळे 30-40 लाख लोकांचा मृत्यू झाला.

कारण बेंगॉलमध्ये प्रामुख्याने भातशेती केली जात असे. या भागातला सगळा तांदूळ ब्रिटिशांनी युद्धात लढणा-या सैन्यांसाठी पाठवला होता. इथल्या लोकांना खाण्यासाठी अन्न मिळाले नाही.

संपूर्ण जग 20-30 वर्ष मागे गेले

अमेरिकेने जपानवर केलेल्या हल्ल्याचे प्रायश्चित्त म्हणून जपानला अमेरिका संरक्षण देत आहे. अमेरिकन संरक्षणाच्या छत्रीखाली जपान सध्या वाढतो आहे. जपानमध्ये अमेरिकेचे सैन्य आहे.

जपानवर कुणी हल्ला केला, तर अमेरिका जपानच्या बाजूने उभा राहिल. जपानला यामुळे सुधारण्याची मोठी संधी मिळाली आहे. संरक्षण क्षेत्रावर जपानला काहीही खर्च करावा लागत नाही.

तिसरे महायुद्ध होऊ नये, म्हणून संयुक्त राष्ट्र संघाची (UNO) स्थापना करण्यात आली. UNO आतापर्यंत तिसरे महायुद्ध होण्यापासून रोखण्यास यशस्वी ठरला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like