Pimpri News: कोरोनाची रुग्णसंख्या घटल्याने चाचण्या करणाऱ्यांचे प्रमाणही घटले

एमपीसी न्यूज – कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने आजपासून निर्बंधमुक्तीची गुढी उभारली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना रुग्णांची संख्या 30 च्या आतमध्ये आली आहे. रुग्णसंख्या घटल्याने दैनंदिन तपासण्यांचे प्रमाणही घटले आहे. शहरात सद्यस्थितीत दिवसाला सरासरी दोन ते तीन हजार तपासण्या होतात.

शहरात मागील वर्षीच्या डिसेंबरमध्ये रुग्णांची संख्या वाढली होती. त्यावेळी दिवसाला सरासरी सहा ते सात हजार तपासण्या केल्या जात होत्या. जानेवारी महिन्यात 3 लाख तपासण्या झाल्या. शहरात मार्च महिन्यात 68 हजार तपासण्या करण्यात आल्या आहेत. या आकडेवारीवरून शहरातील तपासण्यांची संख्या घटल्याचे दिसून येते. शहरात जानेवारीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढली होती.  या एका महिन्यात 68 हजार 781  रुग्णांची नोंद झाली होती. या काळात रुग्णवाढीचा वेग जास्त होता. परंतु, बहुतांश रुग्णांना सौम्य लक्षणे होती. त्यामुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या कमी होती.

जानेवारीत वाढलेली रुग्णसंख्या महिन्याभरातच कमी झाली. फेब्रुवारीमध्ये 10 हजार 793 रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर मार्चमध्ये रुग्णसंख्येचा आलेख कमी होत आहे. दिवसाला 30 हून कमी रुग्णसंख्या आली आहे. मृत्यू होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही कमी झाले आहे. रुग्णसंख्या घटल्याने शहरातील जम्बो कोविड सेंटर बंद करण्यात आले आहे तसेच ऑटोक्लस्टर येथील रुग्णालय बंद आहे. सद्यस्थितीत शहरात 80 सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी दोन रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत, तर 78 जण गृह विलगीकरणात उपचार घेत आहेत. कन्टेनमेंट झोनची संख्याही घटली आहे. सद्यस्थिती मेजर कन्टेनमेंट झोन संख्या 5 तर मायक्रो कन्टेनमेंट झोन 294 आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.