Balewadi: तयारी मतमोजणीची! मतमोजणीवेळी मोबाईल आणू नये; प्रतिनिधी बदलता येणार नाही

निवडणूक निर्णय अधिका-यांच्या सूचना; आकुर्डीत निवडणूक अधिकारी, उमेदवारांच्या प्रतिनिधींची बैठक

एमपीसी न्यूज – मतमोजणी कक्षात उमेदवारांच्या प्रतिनिधीने मोबाईल आणता कामा नये. ओळखपत्र दर्शनी भागात लावावे. ओळखपत्राशिवाय कोणालाही परवानगी दिली जाणार नाही. प्रतिनिधी बदलता येणार नाहीत. या मतदारसंघातून दुस-या मतदारसंघात जाता येणार नाही. मतमोजणीचे 14 राऊंड होणार आहेत. एकमेकांचा पास वापरल्यास कारवाई होऊ शकतो. त्यामुळे सर्वांनी दक्षता घ्यावी, अशा सूचना मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी उमेदवारांच्या प्रतिनिधींना दिल्या.

मावळ आणि शिरुर लोकसभा मतदारसंघातील ईव्हीएम मशीन (मतदान यंत्रे) बालेवाडी क्रीडा संकुलातील स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आली आहेत. निकाल अवघ्या 10 दिवसांवर आला आहे.

  • 23 मे रोजी बालेवाडी येथे मतमोजणीची प्रक्रिया होणार असून सर्वांना निकालाची प्रतिक्षा लागली आहे. निवडणूक विभागाने मतमोजणीची तयारी पूर्ण केली असून मतमोजणी प्रक्रियेची माहिती देण्यासाठी निवडणूक विभागाने निवडणूक लढविलेल्या उमेदवारांच्या प्रतिनिधींची आज (सोमवारी) बैठक आयोजित केली होती.

आकुर्डीतील पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या कार्यालयातील सातव्या मजल्यावर ही बैठक पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला पिंपरी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांचे प्रतिनिधी मयुर कलाटे, फजल शेख, प्रदीप गायकवाड, शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजाराम पाटील यांचे प्रतिनिधी देखील बैठकीला उपस्थित होते.

यावेळी कविता द्विवेदी म्हणाल्या, मावळ लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघानिहाय मतमोजणीसाठी 14 टेबल असणार आहेत. एकूण 84 टेबलवर मतमोजणी होणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघाठी उमेदवारांचे स्वतंत्र प्रतिनिधी असणार आहेत. प्रत्येकाकडे ओळखपत्र असणे आवश्यक आहे. प्रतिनिधी बदलता येणार नाही. या मतदारसंघातून दुस-या मतदारसंघात जाता येणार नाही. पार्किंगसाठी जागा उपलब्ध करुन दिली आहे. त्याच ठिकाणी वाहने पार्क करावीत.

उमेदवारांच्या प्रतिनिधींनी मतमोजणी दिवशी सकाळी सहा वाजता हजर रहावे. ‘स्ट्राँग रुम’ उघडताना प्रतिनिधीने उपस्थित रहावे. आतमध्ये कोणालाही मोबाईल आणता कामा नये. सकाळी सात वाजता आल्यास मतमोजणीला उशिर होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. व्हीव्हीपॅटची मतमोजणी करण्यास विलंब लागू शकतो. त्यामुळे मतमोजणीचा कालावधी वाढू शकतो. प्रतिनिधींनी जेवण, चहा, नाष्ट्यांची सोय करावी. एकदा मतमोजणी कक्षात प्रवेश केल्यास बाहेर पडता येणार नाही. बाहेर पडल्यास पुन्हा आतमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे सर्वांनी दक्षता घ्यावी, अशा सूचनाही द्विवेदी यांनी दिल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.