Talegaon Dabhade : ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज सार्वत्रिक उत्सवात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन 9 ते 12 एप्रिल दरम्यान होणार विविध कार्यक्रम

एमपीसी न्यूज – तळेगावचे ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज यांचा चैत्र शुध्द प्रतिपदा गुढीपाडव्याचा सार्वत्रिक उत्सव यावर्षी 9 ते 12 एप्रिल या कालावधीत संपन्न होणार आहे.यानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक,निकाली कुस्ती स्पर्धा, बैलगाडा स्पर्धा तसेच मनोरंजनाचे भरगच्च कार्यक्रम घेतले जाणार असल्याचे उत्सव समितीचे अध्यक्ष मिथुन मारुती काकडे यांनी सांगितले. पंचक्रोशीतील भाविकांनी आवर्जून सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहावे असे आवाहन डोळसनाथ महाराज उत्सव समिती व मंदिर नवनिर्माण समितीकडून करण्यात आले आहे.
यामध्ये मंगळवारी ( दि.9 एप्रिल ) रोजी सकाळी श्री डोळसनाथ महाराजांचा अभिषेक, दुपारी मोठ्या रकमेचे बक्षीस ठेवलेल्या बैलगाडा स्पर्धा,सायंकाळी श्री डोळसनाथ महाराज यांची पालखी मधून ग्रामप्रदक्षिणा, रात्री घोरावाडी स्टेशनाच्या मैदानावर कै.लोकशाहीर साहेबराव नांदवळकर यांचे आश्रयाखाली वसंत नांदवळकर सह रवींद्र पिंपळे यांचा तंटा तिघींचा पण नवरा कुणाचा या नाट्याव्दारे लोकनाट्य तमाशा तसेच श्री डोळसनाथ महाराज मंदिरा समोर श्री राम कला पथक मंडळ पवळेवाडी यांचे रंगीत संगीत भारुडाचा कार्यक्रम होणार आहे.
दुसऱ्या दिवशी दि.10 एप्रिल रोजी सकाळी लोकनाट्य तमाशाची हजेरी तसेच गणपती माळ येथे दुसऱ्या दिवशीच्या बैलगाडा स्पर्धाचे आयोजन केले आहे. तसेच यात्रेकरूंची भांडाराच्या रूपाने भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.रात्री 8 वाजता मारुती मंदिर चौकात डीपी रोडवर बारा  गावांच्या बारा अप्सरा हा  ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम होणार आहे.

Lokasabha election : संजोग वाघेरेंसारखा विनम्र माणूस मावळमधून विजयी करु : शशिकांत शिंदे यांचे आवाहन

तसेच दि.11 रोजी सायंकाळी 3 ते रात्री 8 वाजेपर्यंत भोई आळी मळा येथील मैदानात निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान भरविण्यात येणार आहे. यासाठी एकूण 7 लाख 6 हजार 777 रुपया  पर्यंत बक्षिसे ठेवली आहेत. तसेच चांदीच्या गदा,शिव प्रतिमाआदि रोख बक्षिसे ठेवण्यात आली असून याचे निवेदन पै.हंगेश्वर धायगुडे करणार आहेत.
दि.12 एप्रिल रोजी रात्री 8 वाजता शैलेश लोखंडे प्रस्तुत लावण्यवती चंद्रा आर्केट्राचा कार्यक्रम श्री डोळसनाथ महाराज मंदिराच्या प्रांगणात होणार आहे.
मावळ तालुक्यामध्ये नावलौकिक प्राप्त झालेला हा ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज यांचा उत्सव असतो. तरी डोळसनाथ महाराज उत्सव समिती, व मंदिर नवनिर्माण समिती यांनी केलेल्या आवाहनानुसार सर्वांनी सहभागी होऊन उत्सवाचा आनंद लुटावा असे आवाहन उत्सव समितीकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.