Baramati News : जबरी मारहाणीच्या खटल्यातून सागर खलाटे व इतर आरोपींची निर्दोष मुक्तता

एमपीसीन्यूज : जबरी मारहाण केल्याच्या खटल्यातून सागर खलाटे व त्यांचे दोन साथीदार सागर दळवी, सुरेंद्र (बाळू) चव्हाण या आरोपींची बारामती  प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी. एन. वाघडोळे यांनी निर्दोष मुक्तता केली. ही घटना बारामती येथील हॉटेल निर्मल भवन समोर 8 जुलै 2007 रोजी सायंकाळी 5.45 च्या सुमारास घडली होती.

आरोपी व त्यांचा मित्र श्री. बनकर यांच्यामध्ये पैशाच्या कारणावरून भांडण झाले. त्यात आरोपींनी तलवार, वस्तरा आणि काठय़ांनी मारहाण केली आरोप होता. फिर्यादी व साक्षीदार श्री. आगावणे यांच्या नाक, गाल तसेच हातावर गंभीर जखमा झाल्या होत्या.

या बाबत बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्यात सरकार पक्षाने एकूण सहा साक्षीदार तपासले होते. विशेष म्हणजे यातील एकही साक्षीदार फितूर झाला नाही.

भर दिवसा बारामतीमधील गजबजलेल्या ठिकाणी ही घटना घडली होती. तसेच यातील फिर्यादी व आरोपी यांचा राजकीय पक्षाशी संबंध असल्यामुळे या खटल्याच्या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष् लागून राहिले होते.

सदरची मूळ घटना वेगळीच आहे. त्यात एकाच आरोपीचा हजर असल्याचा उल्लेख होता. तसेच उभयतांमध्ये केवळ शाब्दिक चकमक झाली होती. इतर आरोपींना या प्रकरणात मुद्दाम गोवले आहे. त्या बाबत आरोपी यांनी एक तक्रार पोलिस ठाण्यात दिली असल्याचे आरोपींच्यावतीने ॲड. विशाल बर्गे यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच त्याची प्रत ॲड. बर्गे यांनी पुरावा म्हणून कोर्टात सादर केली. त्यानंतर या खटल्याला वेगळेच वळण लागले होते.

फिर्यादी, साक्षीदार, सगळे पंच हे एकमेकांचे खास मित्र होते, हे त्यांच्या उलट तपासात सिद्ध झाले. फिर्यादी व जखमी यांनी कोर्टात दिलेल्या साक्षीमध्ये घटनास्थळ, हत्यारे, तसेच तिथे हजर असलेले तथाकथित साक्षीदार यांच्याबाबत मोठी तफावत असल्याचे वकील ॲड. बर्गे यांनी यांनी कोर्टाच्या निर्दशनास आणून दिले तसेच तोंडी पुरावा आणि वैद्यकीय पुरावा यात कसा विरोधाभास आहे हेही त्यांनी सिद्ध करून दाखविले.

शिवाय अतिशयोक्ती पूर्ण फिर्याद दिल्यामुळे तथाकथित हल्ल्याची घटना घडली नसल्याचा युक्तिवाद त्यांनी केला. त्यामुळे सरकारी पक्षाने दिलेला कोणताच पुरावा विश्वसनीय नसल्याचे मत कोर्टाने नोंदवले व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. याकामी इतर आरोपीतर्फे ॲड. तौफिक शिकिलकर यांनीही काम पाहिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.