Bavdhan : मुंबईच्या पोलिसाला पत्नी आणि मुलांसमोर बेदम मारहाण करत लुटले

एमपीसी न्यूज – कुटुंबासोबत कारने चाललेल्या मुंबईतील पोलिसाला तिघांनी मिळून बेदम (Bavdhan) मारहाण करत लुटले. तसेच, लाथा बुक्क्या मारून त्यांच्या कारचे नुकसान केले. ही धक्कादायक घटना मंगळवारी (दि. 29) रात्री पावणेदहाच्या सुमारास मुंबई- बंगळुरू महामार्गावर बावधन येथे घडली.

राहुल पोपट दडस (वय 33, रा. मरोळ पोलीस कॅम्प, अंधेरी पूर्व, मुंबई) यांनी मंगळवारी (दि. 29) रात्री हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, गण्या (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) आणि त्याच्या अन्य दोन साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Talegaon Dabhade : भगवान श्री गोगादेव जन्मोत्सव उत्साहात संपन्न

वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दडस हे महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असून सध्या मुंबई पोलीस दलात नेमणुकीस आहेत. दरम्यान, मंगळवारी रात्री ते कुटुंबीयांसोबत कारने मुंबईच्या दिशेने जात होते.

दरम्यान, बावधन येथील वाडा हॉटेल समोर कारमध्ये जात असलेल्या आरोपींशी त्यांचा किरकोळ वाद झाला. त्यावेळी तिघांनी मिळून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करीत फिर्यादी यांना बेदम मारहाण केली. फिर्यादी यांच्या पत्नीने आरोपींना ”मारू नका”, अशी विनवणी केली.

तसेच, फिर्यादी यांनी देखील ”मी पोलीस आहे, मुंबईला ड्युटीला चाललो आहे, मला मारू नका”, अशी विनंती केली. मात्र, ”तुझ्यासारखे पोलीस मी कोलतो”, असे म्हणून एका आरोपीने फिर्यादी यांना पुन्हा मारहाण करण्यास सुरुवात केली. फिर्यादी यांच्या शर्टच्या उजव्या खिशातील तीन हजारांची रोकड काढून घेतली. लाथा बुक्क्या मारून फिर्यादी यांच्या कारचे नुकसान केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

कुटुंबियांसोबत जात असलेल्या पोलिसाला मारहाण झाल्याचे समजताच हिंजवडी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून अवघ्या काही तासांच्या आत पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत (Bavdhan) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.