Bavdhan News: गुंगीचे औषध देऊन नेपाळी नोकरांनी पळवला लाखोंचा ऐवज

एमपीसी न्यूज – घरात काम करणा-या नोकरांनी घरमालकिणीला आणि तिच्या दोन मुलांना गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केले. त्यानंतर घरातून लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने घेऊन घरकाम करणारे नेपाळी दाम्पत्य पळून गेले. ही घटना मंगळवारी (दि. 7) मध्यरात्री सव्वाबारा वाजताच्या सुमारास गोल्डन आर्च सोसायटी, बावधन येथे घडली.

हितेश सुभाषचंद्र धिंग्रा (वय 46, रा. गोल्डन आर्च सोसायटी, बावधन) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार किशोर व त्याची पत्नी पूजा (दोघे रा. नेपाळ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची बहीण श्रुती रवी खोसला यांच्या घरात आरोपी किशोर आणि त्याची पत्नी पूजा दोघेजण घरकाम करत होते. मंगळवारी मध्यरात्री सव्वाबारा वाजताच्या सुमारास आरोपींनी श्रुती आणि त्यांच्या दोन मुलांना गुंगीकारक औषध देऊन बेशुद्ध केले. त्यानंतर घरातील लोखंडी लॉकर फोडून तसेच लाकडी कपाटे उघडून दीड लाख रुपये रोख रक्कम, सोन्याचे दागिने चोरून नेले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.