MPC News Special: सावधान! तोतया वधू वर सूचक मंडळ घालताहेत लाखोंचे गंडे

एमपीसी न्यूज – सध्या उपवर मुलांची संख्या वाढत असल्याने वधू शोधून विवाह लाऊन देतो, असे (MPC News Special) आमिष दाखवून तोतया वधू वर सूचक मंडळ मुलाकडील कुटुंबांना लाखो रुपयांचे गंडे घालत आहेत. यासाठी या मंडळांकडून वर्तमानपत्रात जाहिराती देऊन लोकांना आकर्षित केले जात आहे. त्यामुळे जाहिराती पाहून वधू संशोधन करीत असाल तर सावधान !

Pune : पावसाळ्यामध्ये सुरळीत वीजपुरवठ्यासाठी यंत्रणा सज्ज – महावितरण

पिंपरी-चिंचवड मधील एका कुटुंबाने वर्तमानपत्रात वर पाहिजे, अशी जाहिरात वाचली. वधूचे वय 29, उंची 5 फूट 4 इंच, शिक्षण दहावी, घरगुती काम करते, जात मराठा, आई-वडील नाहीत. शेती करणाऱ्यास प्राधान्य असे म्हणून एक मोबाईल क्रमांक देण्यात आला होता. ही जाहिरात वाचून जाहिरातीमधील संपर्क क्रमांकावर फोन केला असता तो क्रमांक वधू वर सूचक मंडळाचा असल्याचे सांगण्यात आले.

मंडळाकडे अनेक उपवर मुलींचे स्थळ आहेत. जाहिरातीमधील वर्णनाच्या मुलीबाबत चर्चा करण्यासाठी सुरुवातीला तीन हजार रुपये भरून मंडळाचे सदस्यत्व घ्यावे लागेल. त्यामुळे त्या कुटुंबाने तीन हजार रुपये भरले. त्यानंतर मुलीकडील मंडळींना विचारून सांगतो म्हणून दोन दिवसांचा वेळ काढला.

मुलीकडील मंडळींना देखील स्थळ पसंत आहे, असे सांगून आता भेट घडवून आणण्यासाठी काही लाख रुपयांची मागणी झाली. मात्र, आपल्याकडे साधा फोन असल्याने आणि ऑनलाईन व्यवहारातील काही ज्ञान नसल्याने आपण प्रत्यक्ष कार्यालयात येऊन रक्कम भरतो असे वराच्या कुटुंबाने सांगितले.

‘आमच्या ऑफिसचे काम सुरु असल्याने ऑफिसमध्ये भेटता येणार नाही. तुम्हाला ऑनलाईन माध्यमातूनच पैसे भरावे लागतील’ अशी वधू वर सूचक मंडळाकडून बोलत असल्याचे भासवणाऱ्या महिलेने सांगितले. ऑफिसचे काम सुरु असले तरी चालेल पण पत्ता सांगा म्हणजे आम्ही तिथे येऊन प्रत्यक्ष पाहतो आणि पुढील व्यवहार करतो, अशी गळ घातली असता त्या महिलेने वाल्हेकरवाडी, चिंचवड येथील एक पत्ता सांगितला. वराकडील मंडळींनी त्या पत्त्यावर जाऊन बघितले असता पत्ताच खोटा असल्याचे उघड झाले.

मुलीची काहीही माहिती नाही. मुलीच्या कुटुंबियांची, पत्ता आणि संपर्क क्रमांकाची माहिती नाही केवळ मध्यस्थीच्या माध्यमातून हा व्यवहार करणे चुकीचे आहे, असे त्या कुटुंबाला वाटले आणि या तोतया वधू वर सूचक मंडळाचे बिंग फुटले.

वधू वर पाहिजे, अशा अनेक ठिकाणी दिसणाऱ्या जाहिरातींमध्ये केवळ संपर्क क्रमांक दिला जातो. फोनवरून संपर्क केल्यास फोनवरील व्यक्ती कितपत खरे बोलते याचा अंदाज येत नाही. पण फोनवरून मोठमोठी आश्वासने दिली जातात. सुखी संसाराची, ऐशोआरामाची स्वप्ने दाखवून मोठ्या रकमेची मागणी करत फसवणूक केली जाते. त्यामुळे अशा प्रकारे लग्न जुळवताना प्रत्यक्ष खातरजमा केल्याशिवाय कोणताही व्यवहार अथवा संबंध जोडू नये, असा सल्ला पोलीस देताहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.