Chinchwad – बहुरूढींचे दर्शन म्हणजे भारूड!” फुले-शाहू-आंबेडकर लोकमान्य व्याख्यानमाला – पुष्प पाचवे

एमपीसी न्यूज – “बहु रूढींचे दर्शन म्हणजे भारूड होय लोकरंजनाच्या आणि मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन करण्यासाठी एकनाथ महाराजांनी भारुडे रचली ” असे प्रतिपादन भारूडसम्राट ह. भ. प. लक्ष्मणमहाराज राजगुरू यांनी श्री दत्त मंदिर चौक, मोहननगर, चिंचवड (Chinchwad) येथे सोमवार, दि. १५ मे २०२३ रोजी केले.

जय भवानी तरुण मंडळ आयोजित सहा दिवसीय फुले – शाहू – आंबेडकर लोकमान्य व्याख्यानमालेत ‘अरे अरे माणसा तू कधी होशील रे माणूस? जगण्याचे अंतिम सत्य!’ या विषयावरील पंचम पुष्प गुंफताना लक्ष्मणमहाराज राजगुरू यांनी बहुरंगी अन् बहूढंगी भारुडांचे सादरीकरण करीत श्रोत्यांना खळखळून हसवत (Chinchwad)अंतर्मुख केले. शाहीर प्रकाश ढवळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तसेच देवेंद्र तायडे, संपत देशमुख, उद्योजक भगवान पठारे आणि जय भवानी तरुण मंडळाचे अध्यक्ष मारुती भापकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

Mahalunge : गुटखा विक्री प्रकरणी एकास अटक

ह. भ. प. लक्ष्मणमहाराज राजगुरू म्हणाले की, “परमेश्वराने दुर्लभ असा नरदेह आपल्याला दिला आहे. या देहाचे सार्थक करण्यासाठी माणसासारखे जगा अन् माणसासारखे वागा. ‘नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी’ असे संत नामदेव महाराजांनी सांगितले. व्यसन ही फॅशन झाली आहे. गुटखा, तंबाखू खाऊन तरुण नपुंसक होऊ लागले आहेत. मृत्यूनंतर माणूस प्रपंचातील एक फुटकी कवडीदेखील सोबत घेऊन जाऊ शकत नाही. भगवंताची भक्ती किंवा देशभक्ती करून जन्माचे सार्थक करा. अंत:करणात ईश्वराला स्थान दिले; तर षड्विकार दूर होतील.

कडकलक्ष्मी, गोंधळी, सुईण,बुरगंडा,वेडी, बहुरूपी अशा विविध भूमिका साकारत राजगुरू यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. भक्तिगीते, कबीराचे दोहे, अभंग, गवळण, भारुडे यांच्या माध्यमातून त्यांच्या सहकाऱ्यांनी श्रोत्यांना खिळवून ठेवले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी वैभव मदने या बालव्याख्यात्याने आपल्या छोटेखानी व्याख्यानाने श्रोत्यांना प्रभावित केले.‌

शाहीर प्रकाश ढवळे यांनी अध्यक्षीय मनोगतातून, “भारतीय संस्कृतीचा प्रसार अन् प्रचार तसेच महापुरुषांचा वैचारिक वारसा भावी पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी व्याख्यानमाला हे एक प्रभावी माध्यम आहे. फुले – शाहू – आंबेडकर लोकमान्य (Chinchwad) व्याख्यानमाला हे कार्य पंचवीस वर्षांहून अधिक काळ सातत्याने करीत आहे, ही कौतुकास्पद बाब आहे. असे गौरवोद्गार काढले.

जय भवानी तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी संयोजनात परिश्रम घेतले. राजेंद्र घावटे यांनी सूत्रसंचालन केले. मारुती भापकर यांनी आभार मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.