Bhosari : पंचविसावा राज्यस्तरीय गदिमा कविता महोत्सव मंगळवारी

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद, महाराष्ट्र साहित्य परिषद भोसरी शाखा आणि लायन्स क्लब इंटरनॅशनल यांच्यातर्फे गीतरामायणकार ग.दि. माडगुळकर जन्मशताब्दीनिमित्त मंगळवारी (दि. 2) सकाळी अकरा वाजता राज्यस्तरीय 25 वा गदिमा कविता महोत्सव आयोजित केला आहे, अशी माहिती संयोजक पुरुषोत्तम सदाफुले व मुरलीधर साठे यांनी दिली.

भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात होणा-या महोत्सवाचे उदघाटन आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस प्रमुख पाहुणे म्हणून महापौर राहुल जाधव तर कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून सुदाम भोरे उपस्थित राहणार आहेत.

यावेळी ज्येष्ठ अभिनेते रमेश देव व अभिनेत्री सीमा देव यांना (जीवनगौरव), दिग्दर्शक नागराज मंजुळे (चित्रमहर्षी), ज्येष्ठ सूत्रसंवादक सुधीर गाडगीळ (शब्दयात्री) , लोककलावंत रेखा मुसळे (गदिमा लोककला), भोसरीतील समता विद्यालय व दिघीतील रामचंद्र गायकवाड विद्यालय (संस्कारक्षम शाळा), श्रीकांत नेऊरगावकर व संदीप कुदळे (उद्योगभूषण) आणि नारायण पुरी (काव्यप्रतिभा) यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

शून्य एक मी (पी. विठ्ठल, नांदेड), उन्हाचे घुमट खांद्यावर (डॉ. अनुजा जोशी, गोवा) या काव्यसंग्रहांना गदिमा साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. प्रशांत केंदळे, पितांबर लोहार, लीनता आंबेकर, शिवाजी बंडगर, कविता काळे, इंद्रजित घुले, शीतल गाजरे, अनंत मुंढे या राज्यातील आठ कवींना ‘आम्ही गदिमांचे वारसदार’ म्हणून निमंत्रित करण्यात आले असून ते आपल्या कविता सादर करणार आहेत. यावेळी चैत्राली अभ्यंकर व सहकारी गीतरामायण सादर करणार आहेत. नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी आणि आशिया मानवशक्ती विकास संस्था यांचे या कार्यक्रमाला विशेष सहकार्य लाभले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.