Bhosari : निरंकारी सामूहिक विवाह सोहळ्यात ९० जोडपी विवाहबद्ध

एमपीसी न्यूज – संत निरंकारी मिशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एका आकर्षक सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये संत निरंकारी मिशनच्या आध्यात्मिक प्रमुख सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या पावन छत्रछायेखाली ९० जोडपी विवाहबद्ध झाली.

महाराष्ट्राच्या ५२ व्या वार्षिक निरंकारी संत समागमाची मुंबईत विधिवत सांगता झाल्यानंतर त्याच ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.  या विवाह सोहळ्याचा प्रारंभ निरंकारी मिशनच्या पारंपारिक ‘जयमाला’ आणि प्रत्येक जोडप्याच्या गळ्यात ‘सामायिक हार’ घालून करण्यात आला. त्यानंतर सुमधूर संगीताच्या चालीवर पवित्र मंत्रांच्या रुपात असलेल्या ४ ‘निरंकारी लांवां’चे (मंगलाष्टका) गायन करण्यात आले. विषेश म्हणजे अक्षता म्हणून फुलांचा वापर करण्यात आला.

सदगुरु माता सुदीक्षाजी नवविवाहित दांपत्यांना मार्गदर्शन करताना म्हटले की, आपापल्या कौटुंबीक जबाबदाऱ्या यथायोग्य पार पाडाव्यात. अधिकारांपेक्षा कर्तव्यपालनावर त्यांनी भर द्यावा. समंजसपणाने अभिमानरहित होऊन एकमेकांचे स्वभाव समजून घ्यावेत व मना-मनाचे नाते जोडावे. भौतिक जीवन जगत असताना आपली आध्यात्मिक ओळख विसरु नये. सत्संग, सेवा आणि नामस्मरण करत भक्तिमय जीवन जगावे. निरंकार प्रभुने सर्वांना सुखशांतीमय जीवन प्रदान करावे, अशी शुभकामना सदगुरु माताजींनी व्यक्त केली.

आजच्या या विवाह सोहळ्यामध्ये वधू-वरांच्या जोड्या आंतरराज्यीय स्वरुपाच्या होत्या. पुणे, मुंबईसह महाराष्ट्राच्या इतर भागातून तसेच गुजरात, उत्तर प्रदेश, हरियाणा, चंदिगड, ओडिशा, कर्नाटक,गोवा आणि आसामचा समावेश होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.