Bhosari : विवाहितेचा छळ आणि जबरदस्तीने गर्भपात केल्याप्रकरणी पतीसह चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – मुलाला गंभीर आजाराचे निदान झाल्याने पतीने पत्नी ( Bhosari ) आणि अवघ्या दोन वर्षांच्या मुलाला सोडले. पतीने मुलाच्या उपचारासाठी खर्च करण्यास नकार दिला. तसेच पतीने पहिल्या पत्नीच्या संमतीशिवाय दुसरे लग्न केले. पत्नीचा जबरदस्तीने गर्भपात केला. याप्रकरणी पतीसह चार जणांच्या विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार डिसेंबर 2019 ते नोव्हेंबर 2023 या कालावधीत लोणी काळभोर आणि भोसरी येथे घडला.

पती राजकिरण भाऊराव मिसाळ, सासू, सासरे भाऊराव लक्ष्मण मिसाळ, दीर योगेश भाऊराव मिसाळ (सर्व रा. लोणीकाळभोर, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी 23 वर्षीय पिडीत विवाहितेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी महिलेचा विवाह राजकिरण याच्यासोबत डिसेंबर 2019 मध्ये झाला. काही महिने संसार सुरळीत चालला. लग्नानंतर पती-पत्नी गोवा येथे फिरायला गेले असता पतीने फिर्यादीवर संशय घेऊन त्यांना मारहाण केली. याबाबत फिर्यादीने कुठेही तक्रार केली नाही.त्यानंतर पतीने घरातील किरकोळ कारणावरून फिर्यादीला मारहाण केली.

फिर्यादी गरोदर असताना पतीने फिर्यादीस पुन्हा मारहाण केली. त्यावेळी फिर्यादीच्या पोटात दुखापत झाली. ऑगस्ट 2021 मध्ये त्यांना मुलगा झाला. जन्मानंतर तीन महिन्यांनी मुलगा आजारी पडू लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी त्याला थॅलेसेमिया हा रक्ताचा गंभीर आजार झाल्याचे निदान झाले.

Nigdi : रविवारी रंगणार भक्ती-शक्ती सायक्लोथॉनचा थरार

त्याच्यावरील उपचारासाठी 30 लाख रुपये एवढा खर्च येणार आहे. हे समजल्यानंतर सासरच्या लोकांनी तक्रारदार महिलेला मानसिक व शारीरिक त्रास देण्यास सुरुवात केली. मुलावर उपचार करण्यास तसेच फिर्यादीला नंदाविण्यासाठी सासरच्या लोकांनी नकार दिला.

जून 2022 मध्ये फिर्यादी दुसऱ्यांदा गरोदर राहिल्या. त्यावेळी पती आणि सासूने फिर्यादीच्या पहिल्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देत फिर्यादीच्या इच्छेविरोधात गर्भपात करण्यास भाग पाडले. फिर्यादी महिला सध्या तिच्या वडिलांच्या घरी राहत असून त्यांच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे. बाळाच्या उपचारासाठी प्रत्येक महिन्याला हजारो रुपयांचा खर्च येत आहे.

तक्रारदार महिलेने पतीला सासरच्या लोकांना विनंती केली असता त्यांनी त्यास दाद दिली नाही. महिलेने पुणे येथील भरोसा सेलकडे तक्रार केली असता ‘मुलाच्या औषधोपचाराचा खर्च करतो. दुसरे लग्न करणार नाही’ असे सांगून पतीने तक्रार मागे घेण्यास भाग पाडले. महिलेच्या संमतीशिवाय पतीने दुसरे लग्न केले असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी महाराष्ट्र राज्य माहिती अधिकार महासंघाचे सचिव प्रदीप नाईक, सामाजिक कार्यकर्ते प्रतीक भालेराव यांनी याबाबत ( Bhosari )  पाठपुरावा केला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.