Bhosari : ‘ती’ त्याच्याशी गोड बोलायची म्हणून ‘ती’च्याशी बोलतानाच मित्राचा खून; आरोपी मित्राची कबुली

भोसरी अपहरण आणि खून प्रकरण

एमपीसी न्यूज – खून केलेल्या मित्राची मैत्रीण त्याच्याशी गोड बोलायची अन माझी मैत्रीण माझ्याशी जास्त बोलत नव्हती. म्हणून मित्र त्याच्या मैत्रिणीशी फोनवर बोलत असतानाच त्याचा खून केल्याची धक्कादायक कबुली आरोपीने पोलीस कोठडीत असताना पोलिसांना दिली. खून केल्यानंतर मित्राच्या घरच्यांकडे खंडणी मागितल्याचे देखील आरोपीने सांगितले आहे.

उमर नासीर शेख (वय 19, रा. इंदीरानगर, वसाहत, खडकी) असे अपहरण आणि खून प्रकरणी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. अब्दुलआहाद सय्याब सिद्धीकी (वय 17, रा. दापोडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. आरोपी उमर याला अटक केल्यावर न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यास 17 जानेवारीपर्यंत (सहा दिवस) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

वरीष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत अब्दुलआहाद आणि आरोपी उमर, या दोघांनाही मैत्रीण होती. मात्र अब्दुलआहाद याची मैत्रीण तासन्‌तास त्याच्याशी फोनवर गप्पा मारत बसायची. माझी मैत्रिण फोनवर बोलत नव्हती. यामुळे त्याच्या विषयी माझ्या मनात अगोदरपासूनच राग होता, अशी कबुली आरोपी उमर याने दिली. यामुळे तो मैत्रीणीशी बोलत असतानाच त्याचा काटा काढल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

तसेच आरोपी उमर याला महागडी मोटार घ्यायची असल्याने त्याने आपला मित्र अब्दुलआहाद याचे शनिवारी रात्री अपहरण करून त्याचा खून केला. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांकडे 40 लाख रुपयांची खंडणी मागितली. पोलिसांनी उमर याला अटक केल्यावर त्याने खुनाची कबुली दिली. दाक्षिणात्य चित्रपट खतरनाक खिलाडी भाग दोन हा चित्रपट पाहून आपल्याला अपहरण आणि खुनाची कल्पना सुचल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.