Bhosari: बालनगरीमध्ये कोरोना केअर सेंटर उभारणार; तज्ज्ञ वास्तुविशारद नियुक्त

Corona Care Center to be set up in Balnagari; Appointed expert architect :कोरोना रुग्णवाढीमुळे महापालिकेचा निर्णय

एमपीसी न्यूज – शहरात कोरोनाचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने महापालिकेतर्फे आता भोसरी गवळीमाथा येथील बालनगरीच्या इमारतीमध्येही तात्पुरत्या स्वरूपात कोरोना केअर सेंटर उभारण्यात येणार आहे. हे सेंटर उभारण्याकरिता वास्तुविशारदाची नेमणूक करण्यात आली आहे. या वास्तुविशारदानेही एक रूपया शुल्कामध्ये निविदा पूर्व व निविदा पश्चात कामे करण्याची तयारी दर्शविली आहे.

सध्या शहरात कोरोनाचा कहर सुरू आहे. कोरोना रूग्णांवर महापालिकेच्या वायसीएम रूग्णालय, भोसरी रूग्णालय तसेच बालेवाडी क्रीडा संकुलात उपचार केले जातात. याशिवाय संशयित रूग्णांसाठीही महापालिकेने काही ठिकाणी क्वारंटाईन सेंटर उभारली आहेत.

महापालिकेच्या क क्षेत्रीय कार्यालय हद्दीत भोसरी गवळीमाथा येथील एमआयडीसीच्या भुखंडावर महापालिकेने बालनगरी ही इमारत उभारली आहे.

आता या बालनगरीच्या इमारतीमध्येही तात्पुरत्या स्वरूपात कोरोना केअर सेंटर उभारण्यात येणार आहे. हे काम करण्यासाठी प्रकल्प आराखडा तयार करणे, तसेच अनुषंगिक कामे करणे आवश्यक आहे.

त्यास अनुसरून या कामांचे नियोजन, संकल्प चित्रे, प्रकल्प आराखडे, पुर्वगणनपत्रक, निविदा संच तयार करणे तसेच कामावर देखरेख करणे आदी निविदा पूर्व व निविदा पश्चात कामांसाठी तज्ज्ञ वास्तुविशारदांची नेमणूक करण्याची गरज आहे.

कोरोना विरोधातील लढाईमध्ये योगदान देण्याच्या दृष्टीकोनातून या कामासाठी आवश्यक निविदा पूर्व व निविदा पश्चात आर्कीटेक्चरल कामे फक्त एक रूपये एवढा मोबदला घेऊन करण्यास तयार असल्याचे पत्र ‘शशी प्रभू आणि असोसिएटस’ या वास्तुविशारदाने महापालिकेला दिले आहे.

त्यानुसार, बालनगरी इमारतीमध्ये कोरोना केअर सेंटर उभारण्याच्या कामासाठी शशी प्रभू आणि असोसिएटस यांची तज्ज्ञ वास्तुविशारद म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.