Bhosari Crime News : शस्त्रे नाचवत गाडीची तोडफोड करून दहशत पसरवली; तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – शस्त्राचा धाक दाखवून एका व्यक्तीच्या खिशातून जबरदस्तीने एक हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर त्या व्यक्तीच्या कारची तोडफोड करून शस्त्रे हवेत नाचवून परिसरात दहशत पसरवली. ही घटना सोमवारी (दि. 5) सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास पसायदान कॉलनी, भोसरी येथे घडली. याबाबत तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रुपेश पाटील (वय अंदाजे 28), किरण कदम (वय अंदाजे 27), दशरथ देवकाते (रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत. याबाबत प्रकाश नामदेव कराळे (वय 55, रा. पसायदान कॉलनी, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोमवारी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घरासमोरील कट्ट्यावर बसले होते. त्यावेळी आरोपी रुपेश आणि किरण हे दोघे पालगन, तर आरोपी दशरथ हा दगड घेऊन फिर्यादी यांच्याकडे आले. फिर्यादी यांच्या घरासमोर मोठमोठ्याने आरडाओरडा करत फिर्यादी यांचा मुलगा स्वराज प्रकाश कराळे हा कोठे आहे, त्याला बाहेर काढ, अशी आरोपींनी दमबाजी केली.

त्यानंतर आरोपी रुपेश याने फिर्यादी यांच्या छातीला पालगन लावून त्यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. तसेच फिर्यादी यांच्या शर्टाच्या खिशातून एक हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. आरोपी दशरथ याने फिर्यादी यांच्या कारवर दगड मारले. त्यानंतर आरोपींनी हवेत शस्त्रे नाचवत मोठमोठ्याने आरडाओरडा केला.

आरोपी रुपेश याने ‘मी भोसरीचा भाई आहे’ असे म्हणत परिसरात दहशत निर्माण केली. दरम्यान परिसरातील नागरिक आरोपींना पाहून सैरावैरा पळाले. दहशत निर्माण करून आरोपी तिथून निघून गेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.