Bhosari: पीएमपीला मिळवून दिले आठ तासात विक्रमी 50 हजारांचे उत्पन्न!

भोसरीतील वाहक कुंदन काळे यांचा गौरव

एमपीसी न्यूज – प्रजासत्ताक दिनाची सुट्टी आणि रोजच्या पेक्षा प्रवाशांची संख्या कमी असताना प्रतिकूल परिस्थितीत कामाच्या वेळेत आतापर्यंतचे विक्रमी 50 हजार रुपयांचे उत्पन्न एका दिवसामध्ये एका वाहकाने मिळवून दिले आहे. या कौतुकास्पद कामगिरीनिमित्त वाहक कुंदन काळे यांचा पीएमपीच्या भोसरी आगारातर्फे आगर व्यवस्थापक शांताराम वाघेरे यांनी गौरव केला.

प्रजासत्ताक दिनी नेहमीपेक्षा प्रवाशांची संख्या कमी होती. भोसरीतील पीएमपीच्या भोसरी-सद्गुरुनगर आगारामध्ये कुंदन काळे कार्यरत आहेत. प्रजासत्ताक दिनी प्रवासीसंख्या कमी असतानाही कुंदन काळे यांनी भोसरी टर्मिनल स्थानकावर सकाळी सात ते दुपारी तीन या वेळेमध्ये वेगवेगळ्या रूटच्या बसची तिकिटे 1 हजार 308 प्रवाशांना देऊन पीएमपीला 50 हजार 275  रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळवून दिले आहे. त्यांची ही कामगिरी कौतुकास्पद असल्याचे, भोसरीचे आगर व्यवस्थापक शांताराम वाघेरे यांनी म्हटले आहे.

विविध सण, यात्रा काळातही कामाच्या वेळेत आतापर्यंतचे उत्पन्न  25 हजारांच्या आसपास होते. मात्र, कुंदन काळे यांनी आतापर्यंतचे विक्रमी 50  हजारांवर उत्पन्न एका दिवसामध्ये मिळवून दिले आहे. त्यामुळे अधिकारी कर्मचा-यांकडून कौतुक केले जात आहे. कुंदन काळे यांनी स्टॅन्ड बुकिंगच्या माध्यमातून पाच रूपयांपासून 70  रुपयापर्यंतच्या तिकिटांचे वाटप केले. कामाप्रती असलेला उत्साह यातून प्रतीत होतो. त्यामुळे आगाराच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.