Bhosari news: …अन् व्यावसायिकाने स्वीकारली वार्डबॉयची नियुक्ती; कोविड रुग्णालयात करताहेत सेवा

एमपीसी न्यूज – कोरोनाची लागण झाली होती. अतिदक्षता विभागात दाखल केले. आता काही खरे नाही, असे वाटले. पण, वायसीएमच्या देवदूत डॉक्टरांनी मला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. यातून मी एकच शिकलो तुमच्याकडील पैसा, संपत्ती हे काही कामाला येत नाही. परमेश्वराने जनकल्याणासाठी जीवदान दिले आहे, असे मी मानतो. त्यामुळेच मी पालिकेची वार्डबॉयची नोकरी स्वीकारून भोसरी रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांची सेवा करत असल्याचे अडीचशे कामगारांचे रोजगारदाते व्यावसायिक सुभाष गायकवाड यांनी सांगितले.

तसेच 16 हजार रुपये मानधन मिळाले असून त्यातील काही रक्कम कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी व काही रक्कम सामाजिक संस्थेला देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सुभाष गायकवाड यांची ट्रॅव्हल एजन्सी आणि सिक्युरिटी एजन्सी आहे. त्यांच्याकडे दोन स्कॉर्पिओ आणि एक टाटा एस (छोटा हत्ती) अशी वाहने आहेत. भागीदारीमध्ये सिक्युरिटी एजन्सीही आहे. त्यांच्याकडे अडीचशे कामगार आहेत. गायकवाड यांना जूनमध्ये कोरोनाचा संसर्ग झाला. त्यामुळे ते खूप घाबरले होते. न्यूमोनियाचे प्रमाणही जास्त होते. श्वास घ्यायला त्रास व्हायचा. डॉक्टरांनी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल केले. आता काही खरे नाही, असे वाटले. पण, मृत्यूशी झुंज देऊन बरा झालो. त्याचवेळी कोरोनाबाधितांची सेवा करायची ठरवले होते, असे त्यांनी सांगितले.

रुग्णसेवेसाठी त्यांनी महापालिकेची जाहिरात वाचून रीतसर अर्ज केला आणि वॉर्डबॉयची नोकरी स्वीकारली. महापालिकेच्या भोसरी रुग्णालयात ते सेवा करत आहेत. स्वतःच्या स्कॉर्पिओ गाडीतून ते रुग्णालयात येतात. इतर कर्मचाऱ्यांसोबत साफसफाई करणे, त्यानंतर केस पेपर देण्याचे काम करतात. रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांचे समुपदेशन करून त्यांच्या मनातील भीती घालवण्याचे काम गायकवाड करतात. विशेष म्हणजे त्यांची पत्नी सविता याही भोसरीतील रुग्णालयातच सहा महिन्यांपासून परिचारिकेचे काम करीत आहेत. रुग्णांच्या ऍन्टीजन टेस्टसह इतर कामे त्या करीत आहेत.

सुभाष गायकवाड सांगतात, ”आसीयूमध्ये उपचार घेत होतो. एकदिवस जेवण करताना समोरील मृत्यू झालेल्या रुग्णाचा मृतदेह गुंडाळत होते. हे बघत असताना मला अश्रू अनावर झाले. माणसाचे आयुष्य काही नाही. याचे खूप वाईट वाटले. त्याचवेळी मी कोरोनाबाधितांची सेवा करण्याचे ठरविले होते. त्यानुसार मी काम करत आहे. माझा व्यवसाय सांभाळून मी सेवा करण्याचा हेतू ठेवून वार्डबॉयचे काम करत आहे. थोडी धावपळ होत आहे. पण, मी ते ऍडजस्ट करत आहे. पहिला पगार नुकताच झाला आहे. काही रक्कम कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी व काही रक्कम सामाजिक संस्थेला देणार आहे”

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.