Bhosari : भोसरी ते परभणी 370 कि.मी.चा प्रवास करून गेलेला तरुण ‘ग्रीन झोन’मधील पहिला कोरोना ‘पाॅझिटीव्ह’

भोसरीतील बहिणीच्या घरातील नऊजण क्वारंटाईन

एमपीसी न्यूज – भोसरी येथील एका फर्निचर दुकानात काम करणारा 21 वर्षाचा तरुण आपल्या हिंगोली येथील जवळा बाजार येथे जाण्यासाठी 12 एप्रिलला रात्री दुचाकीवरून निघाला. तीन जिल्ह्याची सील केलेली सीमा ओलांडून दुसऱ्या दिवशी सकाळी तो परभणी जिल्ह्यात दाखल झाला. परभणी येथील आपल्या बहिणीच्या घरी तो थांबला व नंतर घशामध्ये त्रास होत असल्याने त्याला दवाखान्यात दाखल करण्यात आले, दरम्यान या तरुणाची कोरोनासाठी केलेली चाचणी ‘पॉझिटीव्ह’ आली आहे.

भोसरी येथून हिंगोलीसाठी निघालेल्या 21 वर्षांचा तरुण तीन जिल्ह्यांची सील केलेली सीमा ओलांडून गुप्तपणे परभणी जिल्ह्यात दाखल झाला आणि आत्तापर्यंत एकही कोरोनाचा रुग्ण नसणाऱ्या परभणीमध्ये पहिल्या कोरोना रुग्णाची नोंद झाली आहे. या तरुणाची अहमदनगर-बीड जिल्ह्याची मोटेरी चेक पोस्ट तसेच बीड-परभणी जिल्ह्याची धालेगाव चेक पोस्टवर चौकशी करण्यात आली पण काही आपत्कालीन कारण सांगून तो जिल्ह्यात प्रवेश करण्यात यशस्वी झाला. या दोन्ही चेक पोस्टवर साधारण 19 लोकांच्या संपर्कात आला असून या संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांना ‘क्वारंटाईन’ करण्यात आले आहे. हा तरुण परभणी मध्ये बहिणीच्या घरी ज्या नऊ लोकांच्या संपर्कात आला होता त्यांनाही इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे.

परभणीला जाण्याअगोदर घशामध्ये त्रास होत असल्यामुळे हा तरुण पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात तपासणीसाठी गेला होता.  त्याठिकाणी त्याची वैद्यकीय तपासणी करून तात्पुरत्या गोळ्या देण्यात आल्या व कोरोनासाठी चाचणी करण्यात आली नाही, त्यामुळे संबंधित रुग्ण पूर्वीच ‘पॉझिटीव्ह’ असण्याची शक्यता नाकारता येत नाही. परभणी प्रशासनाकडून पिंपरी-चिंचवड प्रशासनाला सूचना करून भोसरी व परिसरातील ज्या लोकांच्या संपर्क हा तरुण आला होता त्यांनासुद्धा विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

परभणी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्यातील 8 ग्रीन झोन जिल्ह्यामध्ये परभणीचा समावेश होता, पण कायद्याचे उल्लंघन करून जिल्ह्यामध्ये प्रवेश केलेल्या या रुग्णामुळे परभणीत एका कोरोना रुग्णाची नोंद झाली आहे. दरम्यान हा तरुण परभणीचा रहिवासी नसून हिंगोली जिल्ह्यातील जवळा बाजार येथील रहिवासी असल्याचे मुगळीकर यांनी सांगितले. 20 एप्रिलपासून काही जिल्ह्यात नियम शिथिल करून उद्योगधंद्यांना मुभा दिली जाणार होती पण नागरिक अवैधपणे जिल्ह्यात दाखल होत आहेत. त्यामुळे धोका वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी स्थलांतर न करता आहे त्याच ठिकाणी सुरक्षित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.