Bhosari : नगरसेवकाच्या घरासमोर वृद्ध पादचारी महिलेची पर्स हिसकावली

एमपीसी न्यूज – रस्त्याने पायी जाणा-या वृद्ध महिलेच्या हातातील पर्स दुचाकीवरील चोरट्यांनी हिसकावून नेली. ही घटना शुक्रवारी (दि. 30) सायंकाळी नगरसेवक विलास मडिगेरी यांच्या घरासमोर भोसरी येथे घडली.

इंद्रायणीनगर, भोसरी येथे राहणाऱ्या 62 वर्षीय महिलेने याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दुचाकीवरील दोन चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी पावणे सात वाजताच्या सुमारास फिर्यादी वृद्ध महिला या आपल्या मैत्रिणीच्या घरून आपल्या घराकडे पायी चालत येत होत्या. त्या नगरसेवक विलास मडिगेरी यांच्या घराजवळ आल्या असता पाठीमागून दुचाकीवरून दोघेजण आले. त्यांनी ज्येष्ठ महिलेच्या हातातील पर्स व त्यातील मोबाईल फोन असा एकूण आठ हजार 700 रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.