Bhosari: बैलगाडा शर्यतीचा करा हुर्रर…रे, खासदाराला करा भुर्रर…रे!

विलास लांडे यांचा आढळरावांवर निशाणा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड, चाकण, खेड, शिरूर परिसरात होणा-या बैलगाडा शर्यतीवर वारंवार बंदी घातली जाते. इथले खासदार फक्त पत्रव्यवहारांचा चाबूक फिरवतात. सरकारमधले मंत्री आणि अधिकारी मात्र त्यांच्याच पत्राला हुर्रर…रे करून टाकतात, असा हल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विलास लांडे यांनी शिरुरचे शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्यावर चढवला आहे.

श्री क्षेत्र थापलिंग येथे बैलगाडा शर्यतीसाठी सालाबादप्रमाणे फळी फोडण्याची पूर्वापार परंपरा आहे. तिथे फळी फोडण्याच्या कार्यक्रमानंतर प्रशासनाने घातलेला गोंधळ अशोभनीय आहे. बैलगाडा शर्यत होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाने जेसीबी घेऊन घाटच तोडून टाकला. यावर केवळ आश्वासनांची खैरात करणारे खासदार महोदयांनी घाट उकरणारे पोलीस अधिकारी आणि प्रशासकीय अधिका-यांवर कारवाई करावी, अशी टिमकी मिरवत मागणीचा जोगवा मागण्याचा नेहमीचाच प्रयत्न केलाय, अशी खरमरीत टीका विलास लांडे यांनी केली आहे. शिरुरचे खासदार हे लोकप्रतिनिधी आहेत की सरकारचे प्रतिनिधी याचा खुलासा त्यांनी करावा असा सवालही लांडे यांनी उपस्थित केला आहे.

बैलगाडा शर्यत ही पुणे जिल्ह्याची शान आहे. पण, खासदारांनी दिलेल्या पत्राला केंद्रातल्या सरकारने केराची टोपली दाखवली का ? कोर्टात एवढी तगडी बाजू आमच्या बैलगाडा शर्यत आयोजकांनी आणि बैलगाडा मालकांनी मांडूनही निकाल त्यांच्या बाजूने आला नाही, याचाच अर्थ खासदारांनी फक्त सरकार दरबारी पत्र व्यववहार केल्याचा दिखावा केला, हे सरळसरळ दिसून येतंय. खासदार बदला, बैलगाडा वाचवा ही जनतेने केलेली मागणी म्हणजे उद्याची बदलाची सुरूवात आहे.

स्वतःच्याच मिजाशीत फिरणा-या खासदारांनी जनतेला अंगावर घेतलंय, आता हीच जनता त्यांना शिंगावर घेऊन याच बैलगाडा शर्यतीच्या मुद्दा धरुन येणा-या निवडणुकीत शर्यतीच्या घाटावरच आपटल्याशिवाय शांत बसणार नाही, असा थेट निशाणा लांडे यांनी आढळराव यांच्यावर साधला आहे. सातत्याने शेतक-यांसाठीचा फसवा कळवळा दाखवायचा आणि सभेतून माघारी फिरलं की, मुंबईत बसून फक्त कारखानदाराच्या थाटात भांडवलशाहीचा गाडा रेटायचा. आता हे असले धंदे खासदार आढळरावांनी बंद करावेत, नाहीतर घोडामैदान दूर नाही, हे लक्षात ठेवावं, असा इशाराही विलास लांडे यांनी आढळराव पाटील यांना दिला आहे.

बैलगाडा मालकांना आशेला लावून आणि त्यांच्यापुढे केवळ पत्रव्यवहाराचा फार्स खासदारांनी केला. आता अशा भूलथापांना बैलगाडा मालक यापुढे बळी पडणार नाही. त्यांचा यापुढचा लढा राष्ट्रवादी काँग्रेस लढेल आम्ही दाखवून देऊ की, लढा काय असतो, असा स्पष्ट इशारा विलास लांडे यांनी दिला आहे. या पंचक्रोशीतील सर्व बैलगाडा मालकांना घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असल्याचंही लांडे यांनी सांगितले. बैलगाडा मालकांवर जो अन्याय झालाय, त्याला फक्त शरद पवारच समजून घेऊ शकतात, असंही लांडे म्हणाले. बैलगाडा शर्यतीसारख्या जनतेच्या जिव्हाळ्याच्या विषयावर आढळराव सारख्या खासदारांनी पोपटपंची करायची बंद करावी, असा खरमरीत टोलाही विलास लांडे यांनी लगावला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.