आरोग्यास अपायकारक बिस्किटे

(आयुर्वेद सर्वांसाठी)

एमपीसी न्यूज- बिस्किट हा पदार्थ इंग्रजाबरोबर भारतात आला आणि भारतात चांगला रुजला. आज बिस्किटचे मार्केट सध्या अंदाजे रु साडेतीन लाख कोटी रुपये एवढे आहे म्हणजे दरवर्षी भारतीय एवढ्या रकमेची बिस्किटे फस्त करतात.

आयुर्वेदानुसार म्हणाल तर बिस्किटं हा पदार्थ आरोग्यासाठी अपायकारक आहे. आयुर्वेदानुसार बिस्किट हा पदार्थ शिळा आहे. असा शिळा पदार्थ जो आपण पैसे देऊन विकत घेतो. नेहमी बिस्किटं खाल्य्याने अपचन, दमा, मलावष्टम्भ, मूळव्याध, मधुमेह, स्थूलता यासारखे आजार होऊ शकतात. हे आजार असणा-यांनी बिस्किटांपासून दूरच राहणे चांगले. बिस्किटांबाबत काही तथ्य जाणून घेणे गरजेचे आहे.

दूध + बिस्किटं हा नाश्त्याला पर्याय होऊ शकत नाही. मुलांना भूक लागलेली असताना त्यांना पोहे, उपमा, शिरा, फळे असे पौष्टिक पदार्थ देणे आवश्यक आहे. बिस्किटांवर भूक भागवू नये. बहुतांश बिस्किटं हे मैदाने बनलेली असतात. मैदा हा चिकट असून, पचायला जड, आरोग्याला अपायकारक पदार्थ आहे.

बिस्किटातील प्रोटीन्स, मिनरलस, आदी हा जाहिरातबाजीचा विषय आहे. (फेअर अड लावली लाऊन कोणी खरच गोरे झाले आहे का…?) फायबरसाठी बिस्किटं खाणे हा वेडेपणा आहे. पालेभाज्या, फळे, गव्हाचा कोंडा, डाळीची टरफले सलाद यातून आवश्यक फायबरची पूर्तता होते. जवळपास सर्व बिस्किटांमध्ये डालडा तूप असते जे bad cholesterol वाढवते. गाईचे तूप खाण्यास सांगितल्यावर “कोलेस्टेरॉल वाढेल” म्हणून आंबट चेहरा करणारे लोक चवीने बिस्किटं खाताना पाहून हसावे कि रडावे तेच कळत नाही.

डायबीटीससाठी बिस्किटं हा निव्वळ गैरसमज आहे. प्रत्येक प्रकारच्या बिस्किटामध्ये (हो ….मारी बिस्किटंमध्येसुद्धा.. ..!) साखर असतेच ज्यामुळे रक्तातील साखर वाढते. ब्रेड, खारी, पाव टोस्ट …हे बेकरी पदार्थ बिस्किटाचे भाऊबंध आहेत आणि बिस्किटे सारखेच अपायकारक आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे बिस्किट हा शिळा पदार्थ आहे. आयुर्वेद्नुसार शिळा पदार्थ खाऊ नये. आमच्या एका बालदम्याच्या पेशंटला बिस्किटे बंद करायला सांगितल्यावर त्याच्या आईने आम्ही अमुक बाबाची मैदा नसलेली बिस्किट देतो असे अभिमानाने सांगितले. मग मी त्यांना विचारले “तुम्ही पोळ्या बनवता का ?… “हो “कशापासून बनवता “ “अर्थात गव्हाच्या पिठापासून “मग दोन दिवसाची शिळी पोळी तुम्ही मुलाला द्याल का…?” “नाही…? “मग दोन महिन्यापूर्वी बनवलेले बिस्किट कसे चालेल तुम्हाला ?”

बिस्किटं हा क्वचित / एखाद्या वेळी /चवीसाठी /प्रवासात सोय म्हणून खाण्याचा पदार्थ आहे . तुमचा चहा बिस्किटाशिवाय पूर्ण होत नसेल तर ही आरोग्यासाठी धोक्याची घंटा आहे.

डॉ.विशाल मिसाळ (एम.डी)
९२२६९३२४३५

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.