Wakad News : आरोग्य अन् सुरक्षेसाठी सहाय्यक पोलीस आयुक्तांचा नागरिकांसोबत मॉर्निंग वॉक

एमपीसी न्यूज – आरोग्याचे महत्त्व, शारीरिक तंदुरुस्ती आणि समाजाची सुरक्षा अशा तिहेरी संकल्पनेतून मंगळवारी (दि. 28) सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले तसेच पोलीस नागरिकांसोबत मॉर्निंग वॉक करणार आहेत. नागरिक आणि पोलीस यांच्यात चांगला संवाद होऊन चांगल्या पोलिसिंगसाठी या उपक्रमाचा उपयोग होणार आहे.

पिंपरी – चिंचवड सहकारी गृहनिर्माण संस्था फेडरेशन आणि पोलिसांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येणार असून यामध्ये नागरिकांना जवळच्या पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकाऱ्यांसोबत चालण्याची संधी मिळणार आहे. नागरिकांच्या दैनंदिन समस्यांमध्ये पोलिसांची मदत तसेच पोलिसांना नागरिकांची मदत होण्याचा दुहेरी दुवा यातून साधला जाणार आहे.

वाकड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले आणि पिंपरी – चिंचवड सहकारी गृहनिर्माण संस्था फेडरेशनच्या अध्यक्ष तेजस्विनी धोमसे सवाई आणि टीम यांच्या नेतृत्वात नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून हा मॉर्निग वॉक आयोजित करण्यात आला आहे. या वॉकमध्ये अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे, तसेच नागरिकांनी कोरोना संबंधित सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

मंगळवारी (दि. 28) सकाळी सहा वाजता हा मॉर्निंग वॉक सुरू होईल.

या मॉर्निंग वॉकचा पहिला मार्ग वाकड तुकाराम ओंबळे गार्डन, पिंकसिटी रोड, ग्रीन ड्राईव्ह रोड, दत्त मंदिर रोड मार्गे शोनेस्ट, ओमेगा टॉवर चौक असा असेल.

दुसरा मार्ग पार्कस्ट्रीट, अक्षरा एलिमेंट, धनराज पार्क, संस्कृती, पलाश आणि थेरगाव रहाटणी – सोलाना सोसायटी असा असेल, तर तिसरा मार्ग उत्कर्ष चौक रस्ता, छत्रपती चौक रस्ता, सावित्रीबाई फुले गार्डन रस्ता असा असेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.