Loyla Football : बिशप्स, जे.एन.पेटिट, ब्लू रिज प्रशाला संघांची आगेकूच

चमकदार विजयासह उपांत्य फेरीत प्रवेश : लॉयला करंडक

एमपीसी न्यूज  – टाटा ऑटोकॉम्प लायला करंडक वयोगट आंतरशालेय फुटबॉल (Loyla Football) स्पर्धेत जे.एन. पेटिट, बिशप्स, आणि ब्लू रिज संघांनी चमकदार विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला.

PMAY : आकुर्डी, पिंपरीतील घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

लॉयला प्रशालेच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, सामने लॉयला प्रशालेच्या मैदानावर खेळवले जात आहेत.

 

जे.एन.पेटिट टेक्निकल प्रशाला संघाने सनसनाटी निकालाची नोंद करताना सेंट व्हिन्सेंट प्रशालेवर शूट-आऊटमध्ये ४-३ असा विजय मिळविला. याच वयोगटात बिशप्स प्रशाला संघाने पीआयसीटी मॉडेल स्कूलचा ५-० असा पराभव केला.

 

पेटिट आणि सेंट व्हिन्सेंट प्रशाला संघां दरम्यानचा सामना नियोजित वेळेत १-१ असा बरोबरीत सुटला होता. दक्ष पिल्लेने ३५व्या पेटिट संघाला बरोबरी साधून दिली. त्यापूर्वी परम भार्गवने तिसऱ्याच मिनिटाला सेंट व्हिन्सेंटचे खाते उघडले होते.

 

शूट-आऊटमध्ये पेटिट प्रशालेकडून अद्यान शेख, दक्ष पिल्ले आणि युग चौहानने गोल केले. तर व्हिन्सेंट प्रशालेकडून इथान लोबो आणि जॉन अम्बट यांनाच गोल करता आले. पेटिट प्रशालेचा गोलरक्षक ओम दरेकरने व्हिन्सेंट प्रशालेच्या नैतिक गुप्ता आणि देवरथ पोन्नमच्या किक सुरेख अडवल्या.

 

बिशप्स प्रशालेच्या पीआयसीटीवरील मोठ्या विजयात जोसुहा सोंगाटेची हॅटट्रिक (१६, २०, २४वे मिनिट) निर्णायक ठरली. दिव्यन कौशिक आणि अर्जुन देशपांडेने अन्य गोल केले.

 

अन्य एका सामन्यात लॉयला प्रशालेने विद्या व्हॅलीचे आव्हान ५-१ असे सहज संपुष्टात आणले. सिद्धान जाधवने चौथ्याच मिनिटाला विद्या व्हॅलीला आघाडीवर नेले होते. पण, वेदांत गुप्ता (१०वे मिनिट) आणि रुद्र शेलारने (३०+१ले मिनिट) गोल करून मध्यंतराला लॉयला प्रशालेला २-१ असे आघाडीवर नेले. उत्तरार्धात वेदांत कांबळेने दोन, रुद्र शेलारनेन एक गोल करताना संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

 

स्पर्धेतील १६ वर्षांखालील गटात बिशप्स प्रशाला संघाने विद्याभवनचे आव्हान २-१ असे संपुष्टात आणले. बिशप्स स्कूल्सकडून इक्बाल शेखने २४व्या मिनिटाला, तर अरन सिद्धवानीने ५४व्या मिनिटाला गोल केले. विद्या भवनचा एकमात्र गोल धैर्य कोरेने ५०व्या मिनिटाला केला.

 

सेंट व्हिन्सेंट प्रशाला संघाने १६ वर्षांखालील गटातून उपांत्य फेरी गाठताना मिलेनियम प्रशाला संघाचे आव्हान ७-२ असे मोडून काढले. मिलेनियमच्या वेद पाटिलने ६व्या, तर व्हिन्सेंटच्या आर्यन सुर्यवंशीने ८व्या मिनिटाला गोल करून सामन्याला वेगवान सुरुवात केली. त्यानंतर मात्र सामन्यावर व्हिन्सेंट प्रशालेचे वर्चस्व राहिले. आर्यनने ३७व्या मिनिटाला वैयक्तिक दुसरा गोल केला.

त्यानंतर देव कांबळेने २०, ४० आणि ४५व्या मिनिटाला गोल करताना हॅटट्रिक नोंदवली. शौनक धापटेने २२व्या आणि निल सेनगुप्ताने २५व्या मिनिटाला गोल केला. अखेरच्या सत्रात मिलेनियमच्या आदित्य कांबळेने ५३व्या मिनिटाला गोल करून एका गोलने पिछाडी भरून काढली.

 

ब्लू रीज प्रशाला संघाने कल्याणी स्कूलचा ५-१ असा पराभव केला. अंग्रम सिंगने तीन, तर अर्जुन दातिर आणि आदित्य देशमुखने एकेक गोल केला. कल्याणी स्कूलकडून एकमात्र गोल अध्यांत भार्गवने केला.

 

निकाल –

 

१४ वर्षांखालील – लॉयला प्रशाला ५ (वेदांत गुप्ता १०वे मिनिट, रुद्र शेलार ३०+१वे मिनिट, वेदांत कांबळे ४२, ४७वे मिनिट) वि.वि. विद्या व्हॅली स्कूल १ (सिद्धान जाधव ४थे मिनिट)

 

बिशप्स प्रशाला, कॅम्प ५ (दिव्यान कौशक १०वे मिनिट, जोसुहा सोंगाटे १६, २०, २४वे मिनिट, अर्जुन देशपांडे ४४वे मिनिट) वि.वि. पीआयसीटी मॉडेल स्कूल ०

 

जे.एन.पेटिट टेक्निकल प्रशाला १,३ (दक्ष पिल्ले ३५वे मिनिट, अद्यान शेख, दक्ष पिल्ले, युग चौहान) वि.वि. सेंट व्हिन्सेंट प्रशाला १,२ (परम भार्गव ३रे मिनिट, इथान लोबो, जॉन अम्बट)

 

१६ वर्षांखालील –

ब्लू रीज प्रशाला ५ (अंग्रीम सिंग १६., २६, ३०वे मिनिट, अर्जुन दातिक १८वे मिनिट, आदित्य देशमुख ६०+२वे मिनिट) वि.वि. कल्याणी स्कूल, १ (अध्यांत भार्गव २३वे मिनिट)

 

बिशप्स प्रशाला, कॅण्प २ (इक्बाल शेख २४वे, अरन सिद्धवानी ५४वे मिनिट) वि.वि. विद्याभवन १ (धैर्य कोरो ५०वे मिनिट)

 

सेंट व्हिन्सेंट प्रशाला ७ (आर्यन सुर्यवंशी ८, ३७वे मिनिट, देव कांबळे २०. ४०, ४५वे मिनिट, शौनक धापटे २२वे मिनिट (पेनल्टी), नील सेनगुप्ता २५वे मिनिट) वि.वि. मिलेनियम प्रशाला २ (वेद पाटिल ६वे मिनिट, आदित्य कांबळे ५३वे मिनिट)

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.