Bopkhel Crime News: चौथ्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – बांधकाम सुरु असलेल्या एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडून एका कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना 12 ऑगस्ट रोजी सायंकाळी गणेश शैलेश हाईट बिल्डिंग, गणेशनगर, बोपखेल येथे घडली.

नवनाथ दत्तू सातपुते (वय 42, रा. शिंदेनगर, जुनी सांगवी) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याबाबत त्यांच्या पत्नीने (वय 32) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पांडुरंग मोहन थोरात (वय 45), शैलेंद्र मुरलीधर गोसावी (वय 41, दोघे रा. जुनी सांगवी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेशनगर, बोपखेल येथे गणेश शैलेश हाईट या इमारतीचे काम सुरु आहे. बांधकाम करत असताना आरोपींनी इमारतीच्या भोवती सुरक्षा जाळी लावली नाही. तसेच कामगारांना सुरक्षेचे साहित्य पुरवले नाही. 12 ऑगस्ट रोजी फिर्यादी यांचे पती त्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर सज्जावर पाय ठेऊन काम करत होते. अचानक सज्जा तुटल्याने फिर्यादी यांचे पती खाली पडले. गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. त्याचा तपास केल्यानंतर याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.