Chakan : जीपला बांधून एटीएम मशीन उपसण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला

सायरन वाजल्याने चोरट्यांची धूम

एमपीसी न्यूज- एचडीएफसी बँकचे संपूर्ण एटीएम मशीन पळवून रोकड लुटण्याचा धाडसी अयशस्वी प्रयत्न करण्यात आल्याची घटना शिक्रापूर रस्त्यावर चाकण (ता. खेड) हद्दीतील विशाल गार्डन समोर चंद्र्श्री कॉम्प्लेक्स मध्ये मंगळवारी (दि. 5) पहाटे तीनच्या सुमारास घडली. संबंधित एटीएम मशीन पीकअप जीपला दोरीने बांधून उपसून काढून पळवून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र सायरनचा मोठमोठ्याने आवाज सुरु झाल्याने चोरटयांनी पळ काढला. ए.टी.एम.सेंटरच्या आतील व बाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये आपली छबी येऊ नये म्हणून चोरटयांनी सुरुवातीलाच सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर स्प्रे मारले होते.

एसजीएस कंपनीचे अधिकारी प्रकाश हिरामण पाटील ( वय 35, रा. वडगाव शेरी, ता. हवेली, पुणे) यांनी या बाबत चाकण पोलिसांत तक्रार दिली असून त्यांच्या फिर्यादीवरून चार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक वृत्त असे की, एसजीएस कंपनी एटीएम मशीन बनविण्याचे व एटीएम सेंटरमध्ये सुरक्षेसाठी सायरन सीसीटीव्ही बसवून निगराणीचे काम करते.

फिर्यादी प्रकाश पाटील यांना मंगळवारी पहाटे तीनचे सुमारास एसजीएस कंपनीच्या मुंबई येथील मुख्यालयातून फोन आला की, चाकण येथील एचडीएफसीच्या एटीएम सेंटरमध्ये काही संशयास्पद हालचाली सुरु आहेत. त्यानंतर पाटील यांनी तत्काळ पोलिसांना याबाबतची माहिती दिली. पोलीस आणि फिर्यादी घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच चोरट्यांनी पोबारा केला होता.

त्यानंतर सदरच्या ठिकाणचे सीसीटीव्ही तपासले असता एका पीकअप जीपने चौघेजण सदरच्या एटीएम सेंटर समोर आले. सर्वांनी आपले चेहरे रुमालाने बांधलेले होते. एटीएम सेंटरच्या बाहेरील आणि आतील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळ्या रंगाचा स्प्रे त्यांनी मारला. त्यानंतर एटीएम सेंटरच्याबाहेर उभ्या करण्यात आलेल्या पीकअप जीपला दोरीच्या साह्याने एटीएम बांधले व उपसून काढण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान एटीएमसेंटर मधील सायरन मोठ्याने वाजू लागला. त्यामुळे चौघांनी घटनास्थळावरून धूम ठोकली. एटीएम मशीन उपसण्यात चोरट्यांना यश आले, मशीन उपसताना एटीएमचा समोरील भागही संपूर्णपणे फुटला मात्र त्यातील व्होल्ट सुरक्षित राहिल्याने आतील रक्कम शाबूत राहिली. चाकण पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास चाकण पोलीस करीत आहेत.

दरम्यान एसडीएफसीचे सदरचे एटीएम सेंटर रात्रीच्या वेळी लोकांचा वावर नसल्याने सहज फोडता येण्यासारखे असल्याने अनेकदा असे प्रकार घडले आहेत. शिक्रापूर रस्ता, महाळुंगे, खालुंब्रे, आळंदीफाटा. शिक्रापूर रोड, माणिक चौक, या भागातील एटीएम चोरट्यांनी वेळोवेळी टार्गेट केल्याचे प्रकार समोर येत आहेत. यामध्ये काही सुरक्षा रक्षकांना कायमचे जायबंदी व्हावे लागले तर काहीना प्राणही गमवावे लागले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.