Chakan Corona Update: चाकण एमआयडीसीतील चिनी कंपनीत 70 जण क्वारंटाईन, कंपनीतील सातजणांना कोरोनाची बाधा

Chakan Corona Update: 70 quarantined in Chinese company at Chakan MIDC, 7 tested positive for COVID 19 खेड तालुक्यात आणखी दोघांना कोरोना संसर्ग 

एमपीसी न्यूज – चाकण एमआयडीसीमधील चिनी मूळ असलेल्या एका बड्या बहुराष्ट्रीय कंपनीतील गेस्ट हाऊसमध्ये 70 कामगार क्वारंटाईन असल्याची बाब समोर आली आहे. या कंपनीतील सात जण कोरोना संक्रमित असून त्यांच्या उपचार सुरु आहेत. धक्कादायक म्हणजे कोरोना संसर्ग झालेले बहुतांश जण बडे अधिकारी असल्याची बाबही या कंपनीत विचारणा केल्यानंतर उघडकीस आली आहे.

खेड तालुक्यात दररोज कोरोना रुग्ण मिळून येत आहेत. चाकण एमआयडीसी भागातही अनेक अधिकारी कामगार कोरोना संक्रमित असल्याचे चित्र समोर येत आहे. ही धोकादायक बाब मानली जात आहे.  त्यामुळे एमआयडीसी मधील कारखानदार आणि नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याची आवाहन तालुका आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.

दरम्यान खेड तालुक्यात विशेषतः शहरी भागात, औद्योगिक भागात नागरिक अशी दक्षता घेत नसल्याचे चित्र वारंवार समोर येत आहे. सुटका लॉकडाऊन मधून मिळालेली असली तरी कोरोना सारख्या भयंकर महामारीने अद्याप सुटका दिलेली नाही. हे संकट अधिक भयावह होत आहे. त्यामुळे सर्वांनीच दक्षता घेण्याची नितांत गरज आहे.

खेड तालुक्यात आणखी दोघांना कोरोना संसर्ग 

खेड तालुक्यात शुक्रवारी ( दि. 19 जून) आणखी दोघांना कोरोना संसर्ग झाल्याची बाब समोर आली आहे. सबंधित दोन कोरोना संक्रमित व्यक्तींमध्ये एक जण चाकणमधील तर दुसरी व्यक्ती गोलेगाव भागातील आहे ,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली.  त्यामुळे खेड तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 54 इतकी झाली आहे.

चाकणमधील प्रभाग क्रमांक 19 मध्ये दोन दिवसांपूर्वी एक नर्स कोरोना संक्रमित असल्याची बाब समोर आली होती.  त्यानंतर संबंधित नर्सच्या पतीची कोरोना चाचणी घेण्यात आली. त्यांचा अहवाल शुक्रवारी सायंकाळी प्रशासनाकडे प्राप्त झाला असून संबंधित नर्सच्या पतीलाही कोरोना संसर्ग झाल्याची बाब समोर आली आहे.

दरम्यान चाकण पासून जवळच असलेल्या मरकळ लगतच्या गोलेगाव येथील एका 39 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली आहे. संबंधित व्यक्ती ही गोलेगाव येथून हडपसर येथे काही कामानिमित्त नियमितपणे ये-जा करत होती . त्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याची बाब उघडकीस आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.