Chakan Crime News : पाच लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी पत्रकार, कामगारासह सहा जणांवर गुन्हा; एकाला अटक

एमपीसी न्यूज – घरबांधणीसाठी दिलेले तीन लाख रुपये परत मागितले. पैसे न दिल्याने पैसे देणा-या व्यक्तीने कोर्टात खटला दाखल केला. यावरून सहा जणांनी मिळून पैसे देणारी व्यक्ती ज्या कंपनीत काम करत होती, त्या कंपनीत जाऊन व्हिडीओ रेकॉर्डिंग करून कंपनीच्या कामकाजाची माहिती मागत प्लांटहेड महिलेला शिवीगाळ केली. तसेच प्रकरण मिटविण्यासाठी पाच लाख रुपयांची खंडणी मागितली. याबाबत कंपनीतील कामगार आणि एका पत्रकारासह सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यातील एकाला पोलिसांनी अटक केली आहे.

प्रवीण रूपराव ठाकरे (वय 38, रा. मंत्रा रेसिडेन्सी, निघोजे, ता. खेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह पत्रकार कांबळे, राजे प्रतिष्ठानचा सुरज पोतदार, गणेश (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) आणि अन्य दोन अनोळखी इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामकृष्ण माधव रेड्डी हे निघोजे येथील रामा इंडस्ट्रीज कंपनीत काम करतात. त्यांनी कंपनीतील कामगार प्रवीण ठाकरे याला त्याच्या घराच्या बांधकामासाठी हातउसने म्हणून तीन लाख रुपये दिले होते.

त्याबदल्यात ठाकरे याने रेड्डी यांना तारण म्हणून चेक दिला होता. ठरलेल्या वेळेत पैसे परत न दिल्याने रेड्डी यांनी चेक बँकेत भरला. तो चेक बाउंस झाल्याने रेड्डी यांनी ठाकरे याच्या विरोधात न्यायालयात खटला दाखल केला.

याचा राग मनात धरून ठाकरे याने त्याचा कांबळे नावाचा पत्रकार मित्र, राजे प्रतिष्ठानचा सुरज पोतदार आणि त्याच्या साथीदारांसोबत मिळून रेड्डी काम करत असलेल्या रामा इंडस्ट्रीज या कंपनीत अनधिकृतपणे प्रवेश केला. कंपनीत अनधिकृतपणे व्हिडीओ रेकॉर्डिंग करून कंपनीच्या कामकाजाची माहिती मागत प्लांटहेड प्रिया भोसले यांना शिवीगाळ केली.

हा वाद मिटविण्यासाठी रेड्डी यांच्या वतीने कॉन्ट्रॅक्टर चौहान यांनी पत्रकार कांबळे याला फोन केला. त्यावेळी पत्रकार कांबळे याने हा वाद मिटविण्यासाठी ठाकरे यांना दिलेले तीन लाख रुपये मागायचे नाहीत. तसेच ठाकरे यांना आणखी पाच लाख रुपये द्यायचे. पैसे न दिल्यास माथाडी कामगार कंपनीत आणून कंपनीचे नुकसान करू. कंपनी बंद करून टाकू, अशी धमकी दिली.

याबाबत महाळुंगे पोलीस चौकीत खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी प्रवीण ठाकरे याला अटक केली आहे. त्याच्या अन्य पाच साथीदारांचा शोध सुरु आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश यमगर, दत्तात्रय गुळींग, पोलीस अंमलदार चंदू गवारी, अमोल बोराटे, पवन वाजे, विठ्ठल वडेकर, शिवाजी लोखंडे, संतोष काळे, हिरामण सांगडे, अमोल वेताळ, शरद खैरे, श्रीधन इचके यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.