Chakan : जागेचा ताबा घेण्यावरून झालेल्या वादात एकमेकांच्या अंगावर इंधन टाकून पेटवण्याचा प्रयत्न

बाहेरून आलेल्या जमावाचा थरार

एमपीसी न्यूज- चाकण शहरातील एका खासगी जागेचा ताबा घेण्यासाठी आलेला जमाव आणि एक गट यांच्यामध्ये जोरदार हाणामारी आणि बाचाबाची झाल्याची घटना मंगळवारी (दि. 18) सकाळी दहाच्या सुमारास घडली. यावेळी एकमेकांच्या अंगावर डीझेल टाकण्यात आले. काही स्थानिकांनी हस्तक्षेप करीत संबंधितांकडून आगपेट्या हिसकावून घेतल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान बाहेरून आलेल्या युवक आणि महिलांनी यावेळी प्रचंड दहशत करून दगडफेक केली; येथील सीसीटीव्ही फोडले. घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी बाहेरून आलेला जमाव पळवून लावला.

चाकण मधील बडे व्यावसायिक आणि पुणे जिल्हा भाजपचे माजी उपाध्यक्ष व उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजन परदेशी यांनी बाहेरून मागवलेल्या युवक आणि महिलांनी जमाव जमवून ताबा मिळविण्याचा प्रयत्न केल्याची व इंधन ओतून पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार महेश ओमप्रकाश परदेशी रा. चाकण, ता.खेड) यांच्या कुटुंबियांकडून करण्यात आली आहे. तर राजन परदेशी यांनी मात्र आपल्यावरच ज्वालाग्रही इंधन फेकून जीवघेणा हल्ला झाल्याची तक्रार पोलिसांत दिली आहे. सायंकाळी उशिरापर्यंत राजन परदेशी व महेश परदेशी यांच्या परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्याची कार्यवाही सुरु होती. डीझेल अंगावर ओतल्याने काहींना त्रास सुरु झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबतचे अधिक वृत्त असे की, जुन्या पुणे-नाशिक रस्त्यावर चाकण शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या खासगी जमिनीचा ताबा जमाव गोळा करून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. या वेळी दोन गटांमध्ये बाचाबाची व हाणामारी झाली. बाहेरून आलेल्या युवकांच्या मोठ्या जमावाने यावेळी दगडफेक करीत सीसीटीव्ही सुरुवातीलाच फोडून टाकले तर याठिकाणी आलेल्या महिलांनीही दगडफेक केली. घटनास्थळी काही वेळात दाखल झालेल्या पोलिसांनी बाहेरून आलेला जमावातील काही जणांना ताब्यात घेतले तर काहींना पिटाळून लावले. त्यानंतर सायंकाळी उशिरापर्यंत परस्पर विरोधी फिर्यादींवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.