Chakan : लुमॅक्समधील कामगाराची आत्महत्या; व्यवस्थापन जबाबदार असल्याचा आरोप

दिलीप मोहितेंसह कामगारांची कारवाईची मागणी

एमपीसी न्यूज – लुमॅक्स कंपनीतील कायमस्वरूपी कामगार रजनीश कुमार (वय २६) याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. कामगार संघटनेचे सदस्यत्व स्वीकारल्याने कंपनी व्यवस्थापनाने दिलेल्या त्रासामुळे संबंधित कामगाराने आत्महत्या केल्याचा आरोप कंपनीतील अन्य कामगारांनी केला आहे. याप्रकरणी दोषींवर कारवाई व्हावी, अशी जोरदार मागणी खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी (दि.१६) पोलीस ठाण्यात मोठ्या संखेने आलेल्या कामगारांनी केली.

रजनीश कुमार मागील पाच वर्षांपासून महाळुंगे इंगळे (ता. खेड) येथील लुमॅक्स इंडस्ट्रीज ली. कंपनीत असेम्ब्ली विभागात नोकरीस होता. शुक्रवारी (दि.१५) सायंकाळी त्याने राहत्या घरात आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे कंपनीतील सर्व कामगारांत असंतोष निर्माण झाला आहे. याबाबत संबंधित संघटनेच्या कामगारांनी सांगितले की, रजनीश कुमार याने कामगार संघटनेचे सदस्यत्व स्वीकारले होते.

  • व्यवस्थापनातील अधिकारी हे वारंवार संघटनेच्या सर्व कामगारांना मागील एक वर्षांपासून कामगार संघटनेचा राजीनामा देण्याकरिता निरनिराळ्या मार्गांनी त्रास देत होते. रजनीश कुमार याला कामावरून काढण्याची आणि बदली करण्याची धमकी वारंवार दिली जात होती. याच त्रासाला कंटाळून रजनीश कुमार याने आत्महत्या केल्याचा आरोप कामगारांनी केला असून चाकणच्या पोलीस अधिकाऱ्यांकडे दोषींवर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली आहे.

खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी सांगितले की, रजनीश कुमार या कामगाराने कंपनी व्यवस्थापनातील मनुष्यबळ विकास विभागाच्या अधिकार्यांनी दिलेल्या त्रासामुळे आत्महत्या केली आहे. पोलिसांनी यातील दोषींवर कारवाई करण्यात कुचराई केल्यास रजनीश कुमार याचा मृतदेह पोलीस ठाण्यात आणून ठेवला जाईल, अंत्यसंस्कार केले जाणार नाहीत. चाकण एमआयडीसीतील कंपन्यांचे मालक पैशाच्या बळावर कामगारांना त्रास देत आहेत. पोलीस प्रशासन कामगारांवर दडपशाही करीत आहे. महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ (इंटक) या संघटनेचे प्रदेश सचिव संजय कदम यांनी सांगितले कि, माजी मंत्री सचिन आहिर यांच्या नेतृत्वाखाली कंपनी व्यवस्थापनाच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे.

आत्महत्येचे नेमके कारण शोधणार : सुनील पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चाकण.
रजनीश कुमार या कामगाराच्या आत्महत्ये प्रकरणी चाकण पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कामगार संघटनेचे पदाधिकारी आणि नेत्यांकडून होत असलेल्या आरोपांच्या अनुशंघाने कुठलाही ठोस पुरावा अद्याप समोर आलेला नाही. चौकशी सुरु असून संबंधित कामगाराच्या आत्महत्येच्या खऱ्या कारणाचा शोध घेतला जाईल, असे चाकणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.