Hinjawadi : किराणा दुकानदाराला कोयत्याने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज – किराणा दुकानदार दुकान बंद करून घरी जात असताना त्याला अडवून तीन जणांनी मिळून मारहाण केली. यामध्ये किराणा दुकानदार गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 15) रात्री अकराच्या सुमारास मारुंजी येथील कॅनलजवळ घडली.

याप्रकरणी मयूर अर्जुन बेडकुते (वय 19, रा. पाटीलवस्ती, नेरे दत्तवाडी, ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार राज भरत लोखंडे आणि त्याचे दोन साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मयूर यांचे मारुंजी येथे किराणा मालाचे दुकान आहे. शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास मयूर दुकान बंद करून त्यांच्या दुचाकीवरून घरी जात होते. ते मारुंजी येथील कॅनलजवळ आले असता मयूर यांच्या दुचाकीला आरोपींनी त्यांची दुचाकी आडवी लावली.

आरोपी राज याने मयूर यांना शिवीगाळ करत लोखंडी कोयत्याने मयूर यांच्या डोक्याच्या मागील भागावर मारून गंभीर जखमी केले. तसेच आरोपीच्या दोन साथीदारांनी मयूर यांना हाताने मारहाण केली. आरोपींनी मयूर यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.