Nigadi : जावयाने मागितले दुचाकी घेण्यासाठी पंधरा लाख रुपये

हुंड्याच्या पैशांसाठी विवाहितेचा छळ; पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – कामाला जाण्यासाठी दुचाकी हवी, दुचाकी आणि घर घेण्यासाठी माहेरहून पंधरा लाख रुपये घेऊन येण्याची मागणी पतीने पत्नीकडे केली. तसेच लग्नात ठरलेला हुंडा न दिल्यामुळे विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बेकराईनगर हडपसर आणि यमुनानगर निगडी येथे 10 सप्टेंबर 2017 ते 12 फेब्रुवारी 2019 या कालावधीत घडली.

पती श्रीप्रसाद ज्ञानदेव शेंडगे (वय 25, रा. यमुनानगर, निगडी), ज्ञानदेव नामदेव शेंडगे (वय 54), अलका ज्ञानदेव शेंडगे (वय 45, दोघे रा. राजुरी, ता. पुरंदर), प्रशांत ज्ञानदेव शेंडगे (वय 28), माधुरी प्रशांत शेंडगे (वय 26, दोघे रा. बेकराईनगर, हडपसर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी 25 वर्षीय विवाहितेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि आरोपी श्रीप्रसाद यांचा सप्टेंबर 2017 मध्ये विवाह झाला. लग्नामध्ये मुलीच्या वडिलांनी दोन तोळे सोन्याचे दागिने आणि पाच लाख रुपये हुंडा देण्याचे ठरले होते. तो हुंडा मुलीच्या वडिलांनी दिला नाही. त्यामुळे आरोपींनी विवाहितेकडे हुंड्याची मागणी केली.

नवीन घर घेण्यासाठी तसेच श्रीप्रसाद याला कामावर जाण्यासाठी दुचाकी घेण्यासाठी पंधरा लाख रुपये माहेरहून आणण्याची मागणी करून आरोपींनी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.