FIR IN RTI CASE : माहिती कायद्यांतर्गत महाराष्ट्रात पहिली एफआयआर दाखल

एमपीसी न्यूज – माहिती अधिकार कायद्यानुसार मागितलेली माहिती न दिल्याबद्दल महाराष्ट्रात पहिला गुन्हा (FIR IN RTI CASE) पनवेल पोलीस ठाण्यात नुकताच दाखल झाला आहे. माहिती अधिकार चळवळीच्या लढ्यात ही एक महत्त्वपूर्ण घटना मानली जाते.

माहिती अधिकारांतर्गत मागितलेली माहिती उपलब्ध करून दिल्याप्रकरणी यापूर्वी राजस्थानमध्ये संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे (FIR IN RTI CASE) दाखल झाले आहेत. महाराष्ट्रात प्रथमच अशा प्रकारचा गुन्हा नोंदविला गेला आहे. त्यामुळे माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर वचक बसेल, अशी प्रतिक्रिया माहिती अधिकार महासंघाचे पिंपरी-चिंचवडचे मुख्य संघटक प्रदीप नाईक यांनी ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना दिली.

व्यवसायाने वकील असलेल्या अमित अरविंद कटारनवरे (वय 37, रा. कोनगाव, ता. पनवेल, जि. रायगड) असे या प्रकरणातील फिर्यादीचे नाव आहे. कोन ग्रामपंचायतीचे जन माहिती अधिकारी व ग्रामविकास अधिकारी रमेश तारेकर असे या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.

कोन ग्रामपंचायतीने 2014 ते 2021 या कालावधीत अनुसूचित जाती-जमातीच्या सदस्यांसाठी असलेला 15 टक्के विकासनिधी कशा प्रकारे खर्च करण्यात आला, याबाबत अमित कटारनवरे यांनी माहिती अधिकार कायद्यानुसार आवश्यक त्या कागपत्रांसह माहिती मिळण्याबाबत 24 जानेवारीला लेखी अर्ज केला होता. अनुसूचित जाती-जमाती सदस्यांसाठी असलेल्या 15 टक्के विकास निधी कसा खर्च करावा, याबाबत शासनाचा आदेश, मार्गदर्शक सूचना याबाबत प्रमाणित कागदपत्रे मिळावीत, अशी मागणीही त्यांनी केली होती.

Chinchwad News: कामासाठी आलेल्या महिलेवर बलात्कार; कोणाला काही सांगितल्यास मारण्याची धमकी

ही माहिती 14 फेब्रुवारीपर्यंत अर्जदारास उपलब्ध करून देणे हे ग्राम विकास अधिकारी रमेश तारेकर यांचे कर्तव्य होते. ही माहिती उपलब्ध न झाल्याने कटारनवरे यांनी 11 एप्रिलला पंचायत समितीचे विस्तार अधिकारी यांच्याकडे अपील केले. विस्तार अधिकारी यांनी या प्रकरणी सुनावणीस हजर राहण्याबाबत तारेकर यांना आदेश बजावूनही ते सुनावणीस हजर राहिले नाहीत.

तारेकर यांनी सात दिवसांत ही माहिती उपलब्ध करून द्यावी, असा आदेश विस्तार अधिकारी यांनी नऊ मे रोजी दिला. त्या आदेशानंतरही तारेकर यांनी माहिती व कागदपत्रे उपलब्ध करून दिली नाहीत. त्याबाबत कटारनवरे यांनी गट विकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतरही तारेकर यांच्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने अखेर या प्रकरणी माहिती अधिकार कायद्यातील तरतुदींनुसार पोलिसांकडे तक्रार नोंदविण्याचा (FIR IN RTI CASE) निर्णय कटारनवरे यांनी घेतला.

पनवेल पोलिसांनी या प्रकरणी फिर्याद नोंदवून तारेकर यांच्या विरुद्ध भा.द.वि. कलम 166,175,176,188,217 नुसार गुन्हा (FIR IN RTI CASE) दाखल केला आहे. महिला फौजदार धनश्री पवार पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.