Chakan News: गुटखा साठवणूक आणि विक्री प्रकरणी दोघांना अटक; साडेचार लाखांचा गुटखा जप्त

एमपीसी न्यूज – गुटखा साठवणूक करून त्याची विक्री केल्याप्रकरणी सामाजिक सुरक्षा विभागाने गुरुवारी (दि. 10) दोघांना अटक केली आहे. अटक केलेल्या दोघांसह चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या कारवाईमध्ये साडेचार लाखांच्या गुटख्यासह पावणे सहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

राघवेंद्र उर्फ संतोष विजयशंकर शर्मा (वय 38, रा. बिरदवडी, चाकण. मूळ रा. उत्तर प्रदेश), संदीप ग्यानदास चौधरी (वय 26, रा. बिरदवडी, चाकण. मूळ रा. उत्तर प्रदेश) यांना अटक केली आहे. त्यांच्यासह कृष्णा मुरारी उर्फ कल्लू गुप्ता, रूम मालक राजेश राक्षे (वय 40, रा. भोसरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिरदवडी येथे राघवेंद्र शर्मा हा शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विकत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करून राघवेंद्र आणि त्याचा कामगार संदीप चौधरी यांना ताब्यात घेतले. आरोपी राजेश राक्षे याच्या खोलीत गुटखा साठवून त्याची विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी 22 हजार 340 रुपये रोख रक्कम, चार लाख 55 हजार 440 रुपयांचा गुटखा आणि एक लाखांची एक कार असा एकूण पाच लाख 77 हजार 780 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.