Chakan : चालक व क्लिनरला गंभीर दुखापत करून जबरी चोरी करणा-या आरोपीला अटक

एमपीसी न्यूज – चालक आणि क्लिनरला डोक्यात, हातापायावर आणि पाठीवर गंभीर दुखापत करून 52 हजारांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि. 16) रात्री साडेआठच्या सुमारास शेलपिंपळगाव येथे घडली. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.

संदीप विष्णू फावडे (वय 22, रा. गणेश नगर, वाघोली, ता. हवेली. मूळ रा. सारूळा, ता. औसा, जि. लातूर) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आकाश दगडू वाडेकर (वय 23, रा. शेलपिंपळगाव, ता. खेड) आणि त्याच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संदीप आणि त्यांच्या गाडीवरील क्लिनर रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास शेलपिंपळगाव येथून शिक्रापूरकडे जात होते. ते मोरया हॉटेलच्या समोर आले असता आरोपी आकाश आणि त्याचे दोन साथीदारांनी मिळून संदीप यांना अडविले. तिघांनी मिळून संदीप आणि त्यांच्या क्लीनरला डोक्यात, हातापायावर आणि पाठीवर गंभीर दुखापत केली. त्यानंतर संदीप यांच्याजवळ असलेले 40 हजार रुपये रोख आणि मोबाईल फोन असा एकूण 52 हजारांचा ऐवज आरोपी जबरदस्तीने घेऊन गेले. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी आकाश याला अटक केली आहे. त्याचे दोन साथीदार अद्याप फरार आहेत. पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.