Chakan : गुन्हेगारीवर नियंत्रणाचे पोलिसांसमोर आव्हान​​

नव्या आयुक्तालयात समावेश; मात्र गुन्हेगारी सत्र सुरूच; चाकणमधील स्थिती  

(अविनाश दुधावडे)
एमपीसी न्यूज – मागील अनेक महिने चर्चेत असलेल्या चाकण पोलीस स्टेशनचा समावेश पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात झाला खरा परंतु शहरातील गुन्हेगारीचे सत्र थांबतांना दिसत नाही. मागील पंधरवड्यात दोन खून, अवैध प्रवाशी वाहनचालकाकडून बलात्कार आणि काही गुन्हेगारी टोळक्यांच्या गंभीर हाणामाऱ्या, जबरी चोऱ्या, वाहन चोऱ्या, घरफोड्या, विनयभंग व रोडरोमिओंकडून महिला व मुलींच्या छेडछाडीचा सिलसिला सुरूच आहे. वाहतूक सुरुळीत करण्याच्या निमित्ताने फक्त सामान्य चाकणकरांच्या वाहनांचे फोटो काढून दंडाच्या नोटीसा काढण्यावर नव्याने आलेल्या पोलिसांनी भर दिला असून अवैध प्रवाशी वाहतूक, अवैध धंदे,  सराईत गुन्हेगार, रोडरोमिओ यांच्याकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. 

पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने हातभट्ट्या उध्वस्त करण्यावरच भर दिला आहे. मात्र, कितीही कारवाया केल्या तरी पुन्हा-पुन्हा धगधगणाऱ्या अनेक हातभट्ट्या आजही खुलेआम या भागात सुरूच आहेत. शिवाय चाकण शहर आणि परिसरात खुलेआम गावठी दारू, ढाबे आणि हॉटेल्समधून अवैध दारूची विक्री, मटका, जुगार, गांजा, बेकायदा गॅस विक्री, असे अवैध धंदे जोरात चालू आहेत. पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावरच अवैध धंदे चालू असतानाही पोलीस याकडे दुर्लक्ष का करतात असा नागरिकांचा सवाल आहे.

चाकण शहर आणि एमआयडीसीमधील वाढती गुन्हेगारी आणि गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या माध्यमातून वेगवेगळ्या उपाययोजना करण्याची गरज आहे. नव्या आयुक्तालयात समावेशानंतर चाकणमधील पोलीस बळ वाढले आहे. व्हिजिबल पोलिसिंग दिसू लागले आहे. मात्र, चाकण परिसरातील घडणार्‍या गुन्ह्यांचा आकडा मात्र कमी होताना दिसत नाही. ठिकठिकाणी रेकॉर्डवरील गुन्हेगारांचाच सुळसुळाट सुरू असल्याचे वास्तव पोलिसांकडे दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या आकडेवारीतून समोर येत आहे. नव्याने उदयाला येऊ पाहत असलेल्या टोळक्यांची गुन्हेगारी, महिला व विद्यार्थीनींना त्रस्त करणारे रोड-रोमिओ, एमआयडीसीमधील दादागिरी, सर्व प्रकारचे अवैध व्यवसाय, भंगार माफियांचा उच्छाद कमी करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

नव्या आयुक्तालयात चाकणच्या समावेशानंतर सुरुवातीला रिक्त असलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर नूतन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्यासारख्या अनुभवी आणि खमक्या अधिकाऱ्याची नियुक्ती झाली. गुन्हेगारीचा उंचावलेला आलेख, मोठा हिंसाचार या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक पवार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांची डोकेदुखी वाढली आहेच. परंतु या परिस्थितीतून मार्ग काढून गुन्हेगारीवर, अवैध धंद्यावर नियंत्रण मिळविण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे. अवैध धंदे चालकांच्या चेल्या-चपाट्यांची वाढती गुन्हेगारी डोके वर काढत असून त्यांना वेळीच वेसन घालण्याची गरज आहे.

केवळ एका वर्षात बाराशे ते दीड हजारापर्यंत गुन्ह्यांची नोंद होत असल्याने राज्यातील सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद असलेल्या पोलीस ठाण्यांमध्ये चाकणचा समावेश झाला आहे. त्यामुळे केवळ किरकोळ कारवाई करून स्वत:ची पाठ थोपटून घेणाऱ्या पूर्वीच्या काही अधिकाऱ्यांपेक्षा धडाकेबाज कारवाई करून गुन्हे रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे आव्हान नव्या पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाचे वरिष्ठ अधिकारी,गुन्हे शाखा, चाकणचे वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि त्यांच्या नव्या दमाच्या सहकाऱ्यांच्या समोर आहे.

गुन्हेगारी आटोक्यात आणणार : पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी सांगितले की, चाकणमधील गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी अवैध धंदे चालक, रेकॉर्डवरील गुन्हेगार, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टोळ्या यांची माहिती संकलित करण्याचे काम सुरु असून त्यानंतर अवैध धंदे चालक आणि गुन्हेगारीचे कंबरडे मोडले जाईल. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अतिरिक्त आयुक्त मकरंद रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली चाकणसाठी अधिक पोलीस बळ उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.