Chinchwad: स्थापत्य विभागाच्या अभियंत्यांना घेराव

रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप

एमपीसी न्यूज – वाल्हेकरवाडी येथील भोंडवे वस्तीतील शिवतीर्थ कॉलनीतील रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू आहे. या रस्त्यासाठी निकृष्ट दर्जाचे डांबर वापरले जात असल्याची तक्रार करणाऱ्या स्थानिक नागरिकांना मद्यधुंद अवस्थेत असलेल्या ठेकेदाराच्या पर्यवेक्षकाने अरेरावी केली. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी ब प्रभागाच्या स्थापत्य विभागाचे कनिष्ठ अभियंता उमेश मोने यांना घेराव घातला.

रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे सांगत त्यांनी काम बंद करण्याच्या सूचना केल्या. काम बंद झाल्याने संबंधित ठेकेदार आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी शिवतीर्थ कॉलनीतील रस्त्याच्या कामाची पाहणी केली. रस्त्याचे काम नव्याने करण्यात यावे, अशा सूचना कनिष्ठ अभियंता उमेश मोने यांनी संबंधित ठेकेदारास केल्या.

ठेकेदाराने महापालिकेचे नियम धाब्यावर बसवून काम सुरू केले आहे. या कामासाठीचे डांबर हलक्‍या दर्जाचे आहे. त्यामुळे नागरिकांच्या कररूपी पैशाची उधळपट्टी निकृष्ट कामे करून केली जात आहे, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. संबंधित अधिकारीही या कामाकडे दुर्लक्ष करीत आहेत. या रस्त्याचे काम निकृष्ट होत आहे. याबाबत ठेकेदाराच्या पर्यवेक्षकाला विचारले असता, मद्याच्या नशेतील पर्यवेक्षकाने, काय करायचं ते करा, असे सांगून बेजबाबदारपणे उडवाउडवीची उत्तरे दिल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे.

याबाबत बोलताना कनिष्ठ अभियंता उमेश मोने म्हणाले, ‘वाल्हेकरवाडी परिसरात विविध ठिकाणी अंतर्गत रस्त्याच्या डांबरीकरणाची कामे सुरू आहेत. भोंडवे वस्तीतील शिवतीर्थ कॉलनीत डांबरीकरणाचे काम सुरू होते. याबाबत तक्रार आल्यानंतर या कामाची मी पाहणी केली असता, एका ठिकाणी मारण्यात आलेला पॅच निकृष्ट आढळून आला. संबंधित ठेकेदाराला तो पॅच जेसीबीच्या साह्याने काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत’.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.