Pimpri News : पवना आणि इंद्रायणी नदीचे जीवचक्र नष्ट झाले आहे – क्रांतिकुमार कडूलकर

एमपीसी न्यूज – पवना आणि इंद्रायणी नदीत वाढत्या प्रदुषणामुळे दोन्ही नद्या मरणासन्न अवस्थेत आहेत. पर्यावरण विभाग आणि प्रशासन देखील याकडे अक्षम्य दुर्लक्ष करत आहे. एकेकाळी आरोग्यवर्धक असणाऱ्या या नद्या आज रोगराईचे उगमस्थान झाल्या आहेत. पवना आणि इंद्रायणी नदीचे जीवचक्र नष्ट झाले असल्याचे मत मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाचे कार्यालयीन सचिव क्रांतिकुमार कडूलकर यांनी व्यक्त केलं आहे.

कडूलकर म्हणाले, ‘पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणारी पवना नदीची लांबी अंदाजे 25 किलोमीटर आहे. शहरातील किवळे, रावेत, थेरगाव, वाल्हेकरवाडी, चिंचवड, रहाटणी, काळेवाडी, पिंपरी, पिंपळे सौदागर, कासारवाडी, पिंपळे गुरव, सांगवी या भागातून पवना नदी वाहत जाते. दोन्ही नद्यांचं प्रदूषण पिंपरी महापालिकेच्या भागातच जास्त आहे. पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याजवळ नदीचे उगम स्थान पुढे नदी भीमा नदीस मिळते. पिंपरी-चिंचवड शहराच्या तळवडेपासून चऱ्होलीपर्यंत इंद्रायणी वाहते.’

‘तीर्थक्षेत्र असलेल्या देहू व आळंदीतून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीची अवस्था दयनीय झाली आहे. लाखो वारकरी दरवर्षी आषाढी कार्तिकी एकादशीला, तुकाराम बीजेला देहू व आळंदीत जमतात. इंद्रायणीचे ‘तीर्थ’ प्रशान करून मस्तकाला लावतात. इंद्रायणीचा सर्वाधिक प्रदूषित भाग देहू व आळंदी दिसून येतो.’

_MPC_DIR_MPU_II

‘इंद्रायणीच्या चिखली ते आळंदी अंदाजे 20 किमी अंतरात जलपर्णी, मानवीमैला, मूत्र, दूषित सांडपाणी, कारखान्याचे रसायन मिश्रित पाणी, प्लास्टिक, तेलकट कागद पुठ्ठे अशी घाण टाकली जात आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण खाती याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करत आहेत. नदीसूधार प्रकल्प कागदावरच राहिला अहे. दर वर्षी कोट्यवधी रुपये खर्च करून फक्त जलपर्णी काढण्याचे कंत्राट दिले जात आहे. पण नद्यांची अवस्था ‘जैसे थे’च आहे.’

कडूलकर पुढे म्हणाले, ‘नदीतले जलचर यामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. इंद्रायणी नदीपात्रमध्ये तळवडे, चिखली, मोशी, डुडळगाव, वडमुखवाडी, चऱ्होली, आळंदी, मोई आदी परिसरातील मानवी मैला व दूषित सांडपाणी, उद्योगधंद्यातून निर्माण झालेले सांडपाणी प्रक्रिया न करता सोडले आहे. नद्या या शहरातील रक्तवाहिन्यांसारखेच काम करतात. आपल्या शहरातून वाहणाऱ्या पवना आणि इंद्रायणी या नद्यांची सद्याची परिस्थिती पाहिली असता पुढील काळात या दोन्ही नद्या इतिहास जमा होतील. 1980 च्या दशकात पवना आणि इंद्रायणीच्या तीरावर शेकडो पक्षी असायचे, पाणी शुद्ध असल्यामुळे ऑक्सिजनची मात्रा निसर्गतः होती. पाण वनस्पती, शेवाळे असल्यामुळे माशांचे प्रजजन होत होते, शेकडो किमी उलटा प्रवास करून मोठे मासे अंडी घालायला पावसाळ्यात नदी पात्रात येत होते.’

‘नदी काठाची हवा आरोग्यवर्धक होती. मात्र, 1990 नंतर औदयोगिकरण आणि बांधकामे वाढली, नदीत मासे मरू लागले, गाई म्हशी पाणी पिऊन मेल्या. डासांची उत्पत्ती वाढली, चिकन गुनिया, डेंगू ,कावीळ रोग ई. साथीचे प्रमाण वाढले. खाजगी दवाखान्याची चंगळ होऊ लागली. सार्वजनिक बांधकाम खात्याची लाल निळी रेषा आणि सीमा भिंत नसल्यामुळे नदी पात्रात अतिक्रमण सुरू झाले. आता या दोन्ही नद्या मरणासन्न अवस्थेत आहेत. नद्यांचे पात्र अरुंद होत आहे. निसर्गाने निर्माण केलेल्या या नद्या एके दिवशी दिसेनाश्या होतील. भयंकर पाऊस पडेल, ढगफुटी होईल. आणि हे आभाळाचे पाणी शहरभर पसरून भयानक तडाखा देईल’ अशी भिती कडूलकर यांनी व्यक्त केलं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.