Chikhali News: संत निरंकारी मिशनच्या शिबिरात 227 जणांनी केले रक्तदान

एमपीसी न्यूज – संत निरंकारी मिशनद्वारे आयोजित रक्तदान शिबिराला दात्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. एकूण 227 जणांनी रक्तदान केले.

संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन पुणे झोनच्या माध्यमातून भोसरी सेक्टर अंतर्गत मोरेवस्ती ब्रँच येथे रविवारी सकाळी 9 ते 5 या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये ससून रुग्णालय रक्तपेढी, वायसीएम रुग्णालय रक्तपेढी, औंध रुग्णालय रक्तपेढी यांनी 227 युनिट रक्त संकलन केले. विशेषतः या शिबिरात अंध व्यक्ती भीमराव साळुंखे यांनी रक्तदान करून सामाजिक कार्यात आपला सहभाग दर्शविला.

फ क्षेत्रीय कार्यालयाचे सभापती कुंदन गायकवाड, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष यश साने, सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग साने यांच्या उपस्थितीत शिबिराचे उदघाटन झाले. पुणे झोन प्रभारी ताराचंद करमचंदानी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कोरोनामुळे अनेक रुग्णांना रक्त,प्लेटलेट्स आणि प्लाझ्मा या सर्वांची अत्यंत आवश्यकता भासत आहे. त्यामुळे संत निरंकारी मिशनद्वारे एप्रिल 2020 पासून आतापर्यंत पुणे जिल्ह्यामध्ये 21 रक्तदान शिबिर संपन्न झाली आहेत. ‘

यामध्ये 2128 युनिट रक्त संकलन ससून रुग्णालय रक्तपेढी, वायसीएम रुग्णालय रक्तपेढी, कमांड रुग्णालय रक्तपेढी, औंध रुग्णालय रक्तपेढी यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे फौंडेशनच्या स्वयंसेवकांनी अनेक वेळा आवश्यकतेनुसार प्लाझ्मादान करून अनेक कोरोनाग्रस्तांचे प्राण वाचवले.

आभार अंगद जाधव, सचिन महानोर यांनी मानले. शिबीर यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सेवादल तसेच संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांनी योगदान दिले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.