Chikhali Crime News : प्रेमास नकार देऊन इंस्टाग्रामवर बोलणे बंद केल्याने तरुणीचा विनयभंग

एमपीसी न्यूज – इंस्टाग्रामवर ओळख झालेल्या मित्राने प्रेमसंबंध ठेवण्याची मागणी केली. त्यासाठी तरुणीने विरोध दर्शवून इंस्टाग्रामवर बोलणे थांबवले. यावरून तरुणाने त्याच्या मित्रासोबत येऊन तरुणीसोबत गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. ही घटना शनिवारी (दि. 6) सकाळी चिखली येथे घडली.

रोहित खिल्लारे, लक्ष्मण सरोदे (दोघे रा. ओटास्कीम, निगडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पीडित तरुणीने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आणि आरोपी रोहित यांची इंस्टाग्रामवर ओळख झाली होती. त्यातून ते दोघे मागील चार ते पाच महिन्यांपासून एकमेकांसोबत चॅटिंग व व्हिडीओ कॉलद्वारे बोलत होते. आरोपीने फिर्यादी तरुणीला वारंवार प्रेमाबाबत मेसेज पाठवले. त्यावेळी तरुणीने रोहितला सांगितले की, ‘मला प्रेमात पडायचे नाही. मला शिक्षण पूर्ण करायचे आहे’.

रोहित याला सांगितल्यानंतर तरुणीने तिचे इंस्टाग्रामवरील तिचे अकाउंट बंद केले. या कारणावरून आरोपीने त्याच्या साथीदारासोबत तिच्याकडे येऊन इंस्टाग्रामवर बोलणे का बंद केले, असा जाब विचारला. तसेच तिला शिवीगाळ करून तिच्याशी गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. तसेच तरुणीला बघून घेण्याची धमकी दिली. आरोपी लक्ष्मण याने तरुणीला अश्लील शब्दात बोलून तिचा विनयभंग केला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.