Chikhali News : चिखली-सोनवणे रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये मनसेकडून वृक्षारोपण

एमपीसीन्यूज : पाण्याची पाईपलाईन आणि ड्रेनेजलाईनसाठी रस्ते खोदाई केल्यानंतर डांबरीकरण करण्याकडे दुर्लक्ष झाल्याने चिखली-सोनावणे वस्ती रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली आहे. खड्डे चुकविताना छोटेमोठे अपघात घडू लागल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी या खड्डयांमध्ये वृक्षरोपण करीत प्रशासनाचा निषेध केला.

मनसे प्रभाग क्रमांक 1 टाळगाव -चिखलीचे शाखाध्यक्ष प्रतिक शिंदे यांच्यासह देवेंद्र निकम, ऋषिकेश पाटील, दत्ता धर्मे, नारायण पठारे, तुषार बनसोडे, मनोज दगडे, सुनी चव्हाण आदींनी या आंदोलनात सहभाग घेतला.

यावर्षी 23 जानेवारी 2021ला चिखली-सोनवणे वस्ती रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. परंतु , ‘फ’ क्षेत्रीय कार्यालय स्थापत्य विभागाच्या दुर्लक्षामुळे या रस्त्याचे निकृष्ट डांबरीकरण करण्यात आले. त्यानंतर फेब्रुवारी  ते जुलै 2021 या कालावधीत ड्रेनेज आणि पाण्याची पाईपलाईन टाकण्यासाठी रस्त्याचे खोदकाम करण्यात आले. मात्र, पूर्ण झाल्यानंतर पुन्हा डांबरीकरण करण्याकडे दर्लक्ष केल्याने सध्या हा रस्ता ‘खड्ड्यात’ गेला आहे.

येथून ये -जा करणाऱ्या वाहनचालकांना वाहने चालविताना कसरत करावी लागत आहे. किरकोळ अपघातही घडू लागल्याचा आरोप करीत मनसेच्या कार्यकर्त्यांनी या खड्ड्यांमध्ये वृक्षरोपण करून प्रशासनाचा निषेध केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.