Chikhali News: सराफी पेढीतील सेल्समननेच लांबवले 1 कोटी 18 लाखाचे दागिने

एमपीसी न्यूज – सराफी पेढीत काम करणा-या सेल्समनने ग्राहकांना दाखविण्यासाठी त्याच्याकडे दिलेल्या 2 हजार 496 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांचा अपहार करून सराफाला तब्बल 1 कोटी 18 लाखाचा गंडा घातला. हा प्रकार चिखली – कृष्णानगर चौकातील श्री महावीर ज्वेलर्स या सराफी पेढीत घडला.

मुकेश तिलोकराम सोलंकी (वय 30, रा. मोरेवस्ती, चिखली, मुळ – राजस्थान) असे गुन्हा दाखल केलेल्या सेल्समनचे नाव आहे. जितेंद्र अशोक जैन (वय 35, रा. सोनिगरा प्रिमिया, निगडी गावठाण) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

जैन यांची कृष्णानगर चौकात श्री महावीर ज्वेलर्स या नावाने सराफी पेढी आहे. आरोपी मुकेश हा त्यांच्याकडे सेल्समन म्हणून काम करतो. 15 ऑक्टोबर रोजी जैन यांनी मुकेशकडे ग्राहकांना दाखविण्यासाठी 1 हजार 396 ग्रॅम सोन्याचे मिनी गंठण असलेला बॉक्स, 1 हजार 100 ग्रॅम वजनाचे सोन्याचे नेकलेस आणि राणीहार असलेला बॉक्स दिला होता.

मुकेशने 1 कोटी 18 लाख 56 हजार रूपये किमतीच्या या दागिन्यांचा अपहार केला. तसेच थानाराम चौधरी यांची 10 हजार रूपये किमतीची दुचाकीही मुकेशने लांबवली. सहायक पोलीस निरीक्षक सय्यद तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.