Chikhli : वर्तमानकाळात सजगतेने जगलात तर यश तुमचेच – वृषाली धर्मे-पाटील

एमपीसी न्यूज – “भूतकाळाला गाडून भविष्यकाळाचा वेध घेत वर्तमानकाळात सजगतेने जगलात तर यश तुमचेच आहे !” असे मत युवा व्याख्यात्या वृषाली धर्मे-पाटील यांनी चिखली येथे केले.

शरदनगर, चिखली प्राधिकरण येथे श्री स्वामी विवेकानंद लोकसेवा प्रतिष्ठान आयोजित चार दिवसीय स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेत ‘मला काही सांगायचंय…!’ या विषयावरील द्वितीय पुष्प गुंफताना वृषाली धर्मे-पाटील बोलत होत्या. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका विरोधी पक्षनेते दत्ता साने, नगरसेविका योगिता नागरगोजे, पिंपरी-चिंचवड व्याख्यानमाला समन्वय समिती अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे, समिती सदस्य सुदाम मोरे, भालचंद्र सोहनी, गणेश अंबिके, ज्ञानेश्वर नागरगोजे उपस्थित होते.

यावेळी नगरसेविका योगिता नागरगोजे म्हणाल्या की, “बौद्धिक क्षेत्रासह सर्व ठिकाणी युवा पिढी आघाडीवर असली तरी त्यांना मानसिक स्वास्थ नाही. तसेच युवक-युवती चारित्र्यहीन होताना दिसत आहेत म्हणून प्रबोधनाची नितांत आवश्यकता आहे. राजाभाऊ गोलांडे यांनी, “वेगवेगळ्या व्याख्यानमालांमध्ये युवा व्याख्यात्यांना संधी देण्याचा प्रयत्न पिंपरी-चिंचवड व्याख्यानमाला समन्वय समितीचा असतो. तसेच तंत्रज्ञानात खूप बदल झाले असले तरी त्याचा योग्य कारणांसाठी वापर केला पाहिजे!”असे मत व्यक्त केले.

वृषाली धर्मे-पाटील म्हणाल्या की, “पुरुषप्रधान संस्कृतीत उपभोग्य वस्तू ही स्त्रीची पूर्वी ओळख होती; पण आता स्त्रीला स्वत्वाची जाणीव होऊ लागली आहे. एकीकडे महासत्तेच्या दिशेने झेपावणाऱ्या आपल्या देशात स्त्रीभ्रूणहत्या, अत्याचार, भ्रष्टाचार वाढतोच आहे. यासाठी आदर्श आणि चारित्र्यसंपन्न पिढी घडवण्याची जबाबदारी घरातल्या आईवर आहे. संस्कारक्षम वयात आईने मुलांवर नीतिमूल्य जपणारे योग्य संस्कार केले पाहिजेत. याबाबत निसर्गाकडून शिकण्यासारखे आहे. जिराफ या प्राण्याची मादी उभ्याउभ्याने पिल्लाला जन्म देते. नुकत्याच जन्माला आलेल्या त्या पिल्लाला जोपर्यंत चालता येत नाही; तोपर्यंत ती मादी त्याला लाथा घालत असते. त्यामुळे आपले पाल्य सक्षम होईपर्यंत आईने त्यांना धाक दाखवून किंवा शिक्षा करून घडवण्यात काहीच गैर नाही. महिला नको त्या बाबतीत चिकित्सक असतात; मग आपल्या मुलांच्या संगोपनात तीच चिकित्सा कुठे जाते? सुरवंटातून फुलपाखराची निर्मिती ही कष्टप्रद असते; त्याप्रमाणेच सक्षम पिढी निर्माण करताना कष्ट घेण्याची तयारी ठेवली पाहिजे.
भारत हा तरुणांचा देश आहे, अशी ख्याती असली तरी राजकारणी तरुणाईचा वापर फक्त आपल्या स्वार्थासाठी करून त्यांना व्यसनाधीन आणि मानसिक दुर्बळ बनवत असतात. आजच्या तरुणांची अवस्था पाहता क्रांतिकारकांचे देशासाठीचे बलिदान व्यर्थ ठरेल की काय, अशी भीती वाटते. विविध उत्सवांमध्ये तरुणांची ऊर्जा आश्चर्य वाटावे इतकी वाढलेली दिसते; पण हीच ऊर्जा समाजोपयोगी कामासाठी वापरली; तर देश सामर्थ्यशाली होईल. आत्महत्या ही आयुष्यपासून पळवाट असून संकटांना सामोरे जाणारा जीवनात यशस्वी होतो. स्वामी विवेकानंद यांना अभिप्रेत असणारा युवक कसा असावा, हे समजून घेतल्यास आदर्श हिंदुस्थान निर्माण होईल!”

कविता, शेरोशायरी, सुविचार उद्धृत करीत वृषाली धर्मे-पाटील यांनी विषयाची मांडणी केली. वृद्धाश्रमातल्या आपल्या आईला मरणासन्न अवस्थेतही न भेटणाऱ्या कलेक्टरची कथा सांगत; तसेच स्त्रीभ्रूणहत्या करायला निघालेल्या आई-वडिलांशी त्या गर्भातल्या मुलीने साधलेला काल्पनिक संवाद सादर करीत आणि एकतर्फी प्रेमात होणाऱ्या मुलींच्या हत्यांवर एकांकिकेच्या माध्यमातून अभिनयाचे दर्शन घडवत वृषाली धर्मे-पाटील यांनी श्रोत्यांना भावविवश करून अंतर्मुख केले.

व्याख्यानापूर्वी, सोहम म्युझिकच्या कलाकारांनी भक्तिगीते सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे  प्रास्ताविक रामराजे बेंबडे यांनी  केले. अविनाश आवटे यांनी सूत्रसंचालन केले. मिलिंद वेल्हाळ यांनी आभार मानले.

कार्यक्रमाच्या संयोजनात देवराम मेदनकर, महेंद्र माकोडे, सुनील खंडाळकर, पंढरीनाथ म्हस्के, सुनील पंडित, संतोष ठाकूर, महेश मांडवकर यांनी परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.