Chikhali : ‘ट्रॅफिकमुक्ती’च्या दिशेने टाळगाव चिखली, तळवडेची वाटचाल

एमपीसी न्यूज – महापालिका हद्दीतील टाळगाव चिखली आणि तळवडे (Chikhali) परिसरातील अंतर्गत रस्त्यांच्या कामांना आता गती मिळणार आहे. त्यामुळे समाविष्ट गावातील मोठ्या परिसरातील दळणवळण सक्षम होणार असून, स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे. या दोन्ही गावांची वाटचाल ‘ट्रॅफिकमुक्ती’च्या दिशेने होणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती सभेत टाळगाव चिखली आणि तळवडे भागातील अंतर्गत रस्तयांच्या कामांसाठी सल्लागार नियुक्तीला मंजुरी देण्यात आली.  सन 1999 साली टाळगाव चिखली आणि तळवडे गावचा समावेश झाला. मात्र, अद्यापही अंतर्गत रस्त्यांचा दर्जा निकृष्ठ आहे. त्यामुळे वाढती लोकसंख्या आणि रहदारी याचा विचार करुन तात्काळ रस्त्याची कामे मार्गी लावावीत, अशी सूचना भाजपा आमदार महेश लांडगे यांनी केली होती. त्याची प्रशासनाने अंमलबजावणी सुरू केली आहे.

शहरात  चिखली-मोशी-चऱ्होली असा सर्वात मोठा ‘रेसिडेन्सिअल कॉरिडॉर’ विकसित होत आहे.  चिखली गावाला ऐतिहासिक वारसा आहे.  राज्यातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना अध्यात्म आणि वारकरी सांप्रदायाचे शिक्षण उपलब्ध व्हावे, यासाठी राज्यातील पहिले जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ टाळगाव चिखली येथे सुरू झाले आहे.

त्यामुळे संपूर्ण राज्यातून या ठिकाणी अध्यात्म आणि वारकरी सांप्रदयातील व्यक्ती चिखलीला भेट देतात. तळवडेत आयटी पार्क आणि औद्योगिक पट्टा असल्यामुळे मोठ्या प्रमाणात रहदारी असते. तसेच, श्रीक्षेत्र देहू आणि श्रीक्षेत्र आळंदीला जोडणारा रस्ता चिखलीतून जातो. चाकण औद्योगिक पट्यातून ये-जा करणारे कामगार, कष्टकरी, तळवडे एकआयडी, जाधववाडी भागातील व्यावसिक पट्टा या भागातून मोठ्या प्रमाणात चिखलीतून रहदारी होत असते.  त्यामुळे रस्त्यांची कामे पूर्ण करावी, अशी मागणी आमदार लांडगे यांनी केली होती.

Chakan : पोलीस अंमलदार योगेश ढवळे अपघात प्रकरणातील आरोपी स्वतः पोलिसात हजर

 

… या रस्त्यांना मिळणार गती

महापालिका प्रशासनाकडून पहिल्या टप्प्यात प्रभाग क्रमांक 1 चिखली मधील इंद्रप्रस्थ मंगल कार्यालय ते संतपिठकडे जाणारा 18 मीटर रुंद डीपी रस्ता व इतर डीपी रस्ते विकसित करणे.  चिखली मधील साने चौक ते चिखली चौक रस्ता मंजूर विकास आराखड्यानुसार विकसित करणे.  चिखली मधील देहू आळंदी ते सोनवणे वस्ती कडे जाणारा 30  मीटर रुंद डीपी रस्ता विकसित करणे.

चिखली चौक ते सोनवणेवस्तीकडे जाणारा 24 मी. रुंद रस्ता विकसित करणे.  प्रभाग क्रमांक 12 मधील त्रिवेणी नगर चौक ते तळवडे चौकापर्यंत 24 मीटर रस्ता विकसित करणे.  प्रभाग क्रमांक 12 मधील तळवडे कॅनबे चौक ते भक्ती शक्ती चौकापर्यंत देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीतून जाणारा उर्वरित 24 मीटर रस्ता विकसित करणे.

प्रभाग क्रमांक 12 मधील नदीच्या कडेने जाणारा मंजूर विकास योजनेतील रस्ता विकसित करणे 12  मीटर रुंद आदी रस्त्यांच्या कामांना गदी देण्यात येणार आहे. त्यामुळे चिखली आणि तळवडे परिसरातील अंतर्गत रस्ते विकसित करुन शहराच्या मुख्य रस्त्यांना जोडल्यास ‘कनेक्टिव्हीटी’ वाढणार आहे.

महापालिका विकास आराखड्यानुसार (DP) रस्त्यांच्या विकासाची कामे हाती घेण्यात यावी. त्यामुळे समाविष्ट गावांतील नव्याने वास्तव्यास आलेल्या नागरिकांना पायाभूत सुविधा मिळाल्या पाहिजेत. शहरात समातोल विकासाचे सूत्र प्रभावीपणे राबवायचे असेल, तर प्रशासनाने सकारात्मक कार्यवाही करावी आणि रस्त्यांची कामे पूर्णत्वास नेण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी सूचना केली होती.

त्याला प्रतिसाद देत रस्त्यांची कामे हाती घेण्यात येत आहेत. लवकर याबाबत निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात करावी, असे आमदार महेश लांडगे (Chikhali) म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.