Chikhali : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीच्या कुटुंबियांची पिडीत कुटुंबाला मिटवून घेण्यासाठी धमकी

एमपीसी न्यूज – चिखली येथे भर दिवसा गोळ्या घालून ठार मारलेल्या ( Chikhali) आरोपीच्या कुटुंबीयांनी मयत तरुणाच्या कुटुंबियांना मिटवून घेण्याची धमकी दिली. खुनाच्या गुन्ह्यात फिर्यादीच्या कुटुंबीयांनी आरोपींना मदत करावी अन्यथा संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याचे धमकीत म्हटले आहे. ही घटना रविवारी (दि. 11) सकाळी महादेव नगर, चिखली येथे घडली.

याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार दोन महिला आणि एका अल्पवयीन मुलीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 मे रोजी फिर्यादी यांचा मुलगा सोन्या उर्फ कृष्णा हरिभाऊ तापकीर (21) याचा चिखली कमानीजवळ गोळ्या झाडून खून करण्यात आला. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात सोन्या उर्फ सौरभ पानसरे, सिध्दार्थ कांबळे, करण रोकडे आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा तपास चिखली पोलीस करीत आहेत.

रविवारी सकाळी फिर्यादी, त्यांच्या मुली आणि इतर नातेवाईक घरी असताना आरोपी फिर्यादी यांच्या घरात जबरदस्तीने आले. एका महिलेने फिर्यादी यांना धमकी दिली की, ‘तुमच्या मुलाच्या खुनाच्या गुन्ह्यात करण रोकडे आणि त्याच्या साथीदारांना मदत करा. मदत नाही केली तर तुमच्या मुलाला जसे मारले तसे तुमच्या कुटुंबाला करण रोकडे आणि त्याचे मित्र गोळ्या झाडून संपवून टाकतील. आपसात मिटवून घ्या नाहीतर परिणाम भोगावे लागतील.’ त्यावर फिर्यादी यांनी आरोपींना ‘ मारायच्या आधी आला असता तर मिटवून घेतले असते. माझ्या मुलाचा मर्डर केला आहे. मला न्याय पाहिजे’ असे म्हटले. त्यावर आरोपी महिलेने फिर्यादी यांना पुन्हा धमकी दिली की, तुमच्या सर्व कुटुंबाची माहिती करण रोकडे आणि त्याच्या मित्रांना आहे. मिटवून घ्या नाहीतर कधीही हमला होऊ शकतो, असे फिर्यादीत म्हटले आहे.

म्हणून झाला कृष्णाचा खून

मागील वर्षी नवरात्रीच्या उत्सवात विकास साने यांनी पाटीलनगर चिखली येथील मैदानावर दांडिया कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमात कृष्णा आणि आरोपी यांचे भांडण झाले होते. त्यानंतर कृष्णा याची चिखली परिसरात प्रतिष्ठा वाढू लागली. या रागातून त्याचा गोळ्या झाडून खून केल्याचे समोर आले आहे.

 

मुख्य आरोपीला साताऱ्यातून अटक

या खून प्रकरणातील मुख्य आरोपी सौरभ उर्फ सोन्या बाळासाहेब पानसरे याला सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातून अटक करण्यात आली. पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट एकने ही कारवाई केली ( Chikhali) होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.