Chinchwad Bye-Election : खर्चात राष्ट्रवादीचे नाना काटे पुढे; कोणी, किती केला खर्च?

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीच्या (Chinchwad Bye-Election) अनुषंगाने उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची दुसरी तपासणी आज (सोमवारी) करण्यात आली. खर्चामध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे पुढे आहेत. आजपर्यंत त्यांनी 21 लाख 46 हजार 933 रुपये खर्च केला आहे. त्यांच्यापाठोपाठ भाजपच्या अश्विनी जगताप यांनी 15 लाख 61 हजार 785 आणि अपक्ष राहुल कलाटे यांनी 12 लाख 397 रुपयांचा अर्जपर्यंत खर्च केला आहे. विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवाराच्या प्रचार खर्चाची मर्यादा 40 लाख रूपये इतकी आहे.

भारत निवडणुक आयोग यांचे कार्यालय, निवडणूक खर्च संनियंत्रण संदर्भातील तरतूदीनुसार उमेदवाराने ठेवलेल्या दैनंदिन खर्च विषयक तपासणी केली जात आहे. ही तपासणी तीन टप्प्यात करण्याचे नियोजन आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक अंतर्गत उमेदवारांच्या निवडणूक प्रचार खर्चाच्या तपासणीकरिता खर्च तपासणी कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यापासून निवडणूक निकाल जाहीर होईपर्यंतच्या खर्चाचे सनियंत्रण करण्यात येत आहे. दरम्यान, उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची पहिली 15 फेब्रुवारी रोजी तर दुसरी तपासणी आज पार पडली आहे. तिसरी तपासणी 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या विहित वेळेत पार पडणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली.

उमेदवारांच्या खर्चाची पहिली आणि दुसरी तपासणी निवडणूक आयोगाच्या नियमांप्रमाणे करण्यात आली. निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमांप्रमाणे उमेदवारांनी सादर केलेला खर्च तपासला जात आहे. पुढील तिसऱ्या तपासणीसाठी विहित वेळेत खर्चाचा तपशील सादर करावा, अशी सूचना निवडणूक निर्णय अधिकारी ढोले यांनी सर्व उमेदवारांना दिल्या आहेत.

PCMC : बॅडमिंटन स्पर्धेसाठी महापालिकेने दिले 20 लाख रुपये

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मतदारसंघासाठी निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून संकल्प सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते उमेदवारांचा निवडणूक खर्च आदी अनुषंगाने माहिती घेत असून निवडणूक निर्णय अधिकारी तसेच अन्य संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अधिनस्त खर्च तपासणी कक्ष, फिरते भरारी पथक, स्थिर सनियंत्रण पथक, व्हिडिओ सनियंत्रण पथक, व्हिडीओ पाहणारे पथक आदी विविध पथके कार्यरत आहेत.

विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवाराच्या प्रचार खर्चाची मर्यादा 40 लाख रूपये इतकी आहे. मतदार संघामध्ये एकूण 28 उमेदवार निवडणूक लढवत असून त्यांचे दररोजच्या खर्चाचे लेखे आणि खर्चाच्या पावत्या या लेखांकन पथकाकडे जमा केल्या जातात. त्याचवेळी व्हिडिओ नियंत्रण व पाहणाऱ्या पथकाकडून आलेल्या अहवालानुसार शॅडो रजिस्टर मध्ये उमेदवाराचा रोजचा प्रचारखर्च नोंदला जातो.

त्याचप्रमाणे इतर पथकाकडून रोकड अथवा इतर जप्ती झाल्यास त्याचीही नोंद लेखा पथकाकडून घेतली जाते. लेखाधिकारी इलाही शेख आणि त्यांच्या पथकाकडून हे काम केले जात असून त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सहाय्यक खर्च निरीक्षक म्हणून आयकर अधिकारी प्रकाश हजारे यांची नेमणूक करण्यात आली आहे, असे ढोले यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.